आषाढी एकादशीनिमित्त बाजारात रताळींची आवक   

पुणे : आषाढी एकादशी दिवशी उपवास धरणार्‍यांची संख्या मोठी आहे. उपवासाला चालणार्‍या रताळींची बाजारात मोठ्या प्रमाणात आवक झाली. येत्या रविवारी आषाढी एकादशी आहे. मागील वर्षीच्या तुलनेत दर स्थिर आहेत, अशी माहिती व्यापारी अमोल घुले यांनी दिली. 
 
घुले म्हणाले, यंदा अवकाळी पावसामुळे उत्पादन कमी झाले आहे. जाग्यावर माल खरेदी करणे आणि सातत्याने पडणार्‍या पावसामुळे यंदा एक हजार ते दीड हजार पोत्यांनी बाजारात आवक घटली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत दर मात्र स्थिर आहेत. यंदा प्रतिकिलोला ५० ते ६० रुपये भाव मिळत आहे. तर किरकोळ बाजारात १०० रुपये किलो विक्री होत आहे. बाजारात रताळींची २५०० ते २७०० पोत्यांची आवक होत आहे. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील उंदरगाव, मांजरगाव येथून आवक होत आहे. मागील वर्षी येथील बाजारात ८ ते १० हजार पोती आवक झाली होती. त्यामध्ये घट होऊन २५०० ते २७०० पोती आवक येत आहे. कर्नाटकातूनही आवक सुरू आहे. कर्नाटक रताळीला किलोला ४० रुपये भाव मिळाला आहे. सोलापूर करमाळा, कराड, सातारा, कोल्हापूर याभागातून गावराण रताळाची आवक होत आहे. ही रताळे आकाराने लहान व चवीवा गोड व स्वादिष्ठ आहेत. तर कर्नाटक रताळे आकाराने मोठी व चवीला साधारण कमी गोड असतात, असेही अमोल घुले यांनी नमूद केले. 
 
आषाढी एकादशीच्या उपवासासाठी रताळींची आवक सुरू झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा आणि कर्नाटक येथून आवक होत आहे. रताळी चवीला गोड आहेत. उपवासामुळे नागरिकांकडून रताळीला मोठी मागणी सुरू आहे. मागील वर्षीच्या तुलनेत आवक कमी असली तरी दर मात्र स्थिर आहेत.
 
- अमोल घुले, आडतदार, मार्केट यार्ड
 
गावरान रताळ्याची मागील वर्षीच्या तुलनेत यंदा थोडी आवक कमी असली तर दर चांगला मिळाला आहे. गुरूवारी मार्केटयार्डात २०० पोती रताळ आणली आहेत. पुर्वी पेक्षा यंदा एकरी केवळ ७० ते ८० पोती उत्पादन मिळत आहे.
 
- उमेश कांबळे, शेतकरी करमाळा.
 

Related Articles