शक्तिपीठ महामार्गासाठी जमीन देणार नाही : शेतकर्‍यांची भूमिका   

बीड : वर्धा ते गोवा दरम्यान होणार्‍या शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असली तरी याला ठिकठिकाणी विरोध होत आहे. शक्तिपीठ महामार्गासाठी आम्ही जमीन देणार नाही अशी भूमिका बीडमधील शेतकर्‍यांनी घेतली आहे.  अंबाजोगाईमध्ये मोजणीसाठी आलेले अधिकारी आणि पोलिसांनी शेतकर्‍यांना अरेरावी केल्याचा आरोप शेतकरी कामगार पक्षाने केला. 
 
बीडच्या अंबाजोगाई तालुक्यात मंगळवारी शक्तिपीठ महामार्गाच्या जमीन मोजणीसाठी अधिकारी आले होते. त्यावेळी प्रशासकीय अधिकारी आणि पोलिसांकडून शेतकर्‍यांना अरेरावी करण्यात आल्याचा आरोप शेतकरी कामगार पक्षाकडून करण्यात आला. राज्य सरकार जर महामार्गासाठी बळजबरीने जमिनी घेतल्या जात असतील तर आम्ही हे होऊ देणार नाही. गरज नसताना शक्तिपीठ महामार्ग लादला जात आहे. या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी कामगार पक्षाकडून देण्यात आला आहे.
 
दरम्यान, पोलिस बंदोबस्तात ही मोजणी करण्याचा प्रयत्न केला गेला. यालादेखील शेतकर्‍यांनी विरोध करत जमीन न देण्याची भूमिका कायम ठेवल्याचे दिसून आले. याआधी एप्रिल महिन्यातदेखील शेतकर्‍यांनी शक्तिपीठ महामार्गासाठी आलेल्या अधिकार्‍यांना विरोध केला होता.
 

Related Articles