‘ब्लॅक बॉक्स’ भारतातच   

‘एआय’च्या साहाय्याने तपास

पुणे : अहमदाबाद येथील एअर इंडियाच्या विमान दुर्घटनेचे खरे कारण स्पष्ट करू शकणारा ‘ब्लॅक बॉक्स’ भारतातच आहे. विमान अपघात तपासणी विभाग कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) या आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने तपास करत आहे, अशी माहिती केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री के. राममोहन नायडू यांनी मंगळवारी दिली. तसेच, ‘ब्लॅक बॉक्स’ अधिक तपासणीसाठी अमेरिकेत पाठविण्यात येणार असल्याचा दावा त्यांनी फेटाळून लावला. 
 
भारतीय नागरी उड्डाण मंत्रालय आणि फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (एफआयसीसीआय) यांच्यातर्फे हेलिकॉप्टर आणि लघु विमानांसंदर्भात आयोजित शिखर परिषदेत नायडू यांनी पत्रकारांशी संवाद साधला. केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यावेळी उपस्थित होते.  विमान दुर्घटनेची तीव्रता पाहता ‘ब्लॅक बॉक्स’लाही फटका बसला असून ‘एएआयबी’ तंत्रज्ञानाच्या साहाय्याने त्यातील माहिती संकलित (डीकोड) करण्याचे काम करत आहे. निश्चितच सर्व माहिती मिळेल. तोपर्यंत ‘एएआयबी’ला त्यांचे काम करू द्यावे, असेही नायडू यांनी नमूद केले.
 
अहमदाबाद येथील एअर इंडियाच्या दुर्घटनेतील ब्लॅक बॉक्सलाही तडे गेल्याने त्यातील माहिती तंत्रज्ञानाच्या साहाय्याने पुन्हा मिळविण्यासाठी हा ब्लॅक बॉक्स अमेरिकेत पाठविण्यात येणार आहे. राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा मंडळातून चौकशी केली जाईल. त्यासाठी हवाई तज्ज्ञांचा एक चमुही सोबत पाठविला जाणार आहे, असे सांगण्यात येत होते. मात्र, या सर्व चुकीच्या अफवा असून हा ब्लॅक बॉक्स भारतातच आहे. ‘एएआयबी’ तंत्रज्ञानाच्या साहाय्याने त्यातील माहिती पुन्हा प्राप्त करण्याचे काम करत आहे. विमान दुर्घटनेची सर्व माहिती लवकरच समोर येऊन अपघाताचे कारण स्पष्ट होईल, असे नायडू यांनी सांगितले.  अहमदाबाद विमानतळावरून लंडनला जाणारे एअर इंडियाचे ७८७-८ बोईंग विमान धावपट्टीवरून हवेत झेपावताच अवघ्या काही क्षणात निवासी भागात कोसळले होते. १२ जून रोजीच्या दुर्घटनेत २७० जणांना प्राण गमवावे लागले असून विमानातील तांत्रिक बिघाडाची माहिती समोर आणणारा ‘ब्लॅक बॉक्स’ १३ जून रोजी सापडला असे नायडू यांनी सांगितले. 

हेलिकॉप्टर्स नागरी सेवेत मोठी संधी 

नागरी हवाई वाहतूक क्षेत्रात आमूलाग्र बदल झाले आहेत. स्थानिक पातळीवर हवाई कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी विविध प्रयत्न केले जात आहेत. देशाअंतर्गत हवाई वाहतूक वाढल्यास व्यापार, उद्योग, पर्यटनाला चालना मिळेल. देशात २५० हून अधिक हेलिकॉप्टर्स नागरी सेवेत कार्यरत आहेत. एक हजाराहून अधिक हेलिपॅड्स उपलब्ध आहेत. येत्या काळात या क्षेत्राच्या विस्तारासाठी मोठी संधी आहे असे मत केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले. 
 

Related Articles