घोड धरणामध्ये ७८ टक्के पाणीसाठा   

रांजणगाव गणपती, (प्रतिनिधी) : शिरूर आणि श्रीगोंदा तालुक्याला वरदान ठरलेल्या चिंचणी, ता.शिरूर येथील घोड धरणामध्ये ७८ टक्के पाणीसाठा झाला असून, धरणाच्या ३ दरवाज्यातून घोडनदीपात्रात ५ हजार ५०० क्युसेस वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे नागरिकांसह शेतकरी वर्गात समाधान व्यक्त करण्यात येत आहे. सध्या धरणात ४ हजार ९७७ दशलक्ष घनफुट एवढा पाणीसाठा असुन त्यातील ३ हजार ८२१. ७९ दशलक्ष घनफुट इतका उपयुक्त पाणीसाठा असल्याची माहिती उपविभागीय अभियंता महेश शिंदे यांनी दिली.
 
चिंचणी (ता.शिरूर) येथील घोड धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता ७ हजार ६३८ दशलक्ष घनफूट असुन उपयुक्त पाणीसाठा ५ हजार ४६७ दशलक्ष घनफुट आणि मृत पाणीसाठा २ हजार १७२ दशलक्ष घनफूट आहे. धरणाला दोन कालवे असून उजव्या कालव्याची लांबी ३० कि.मी आणि डाव्या कालव्याची लांबी ८४ कि.मी आहे. घोड धरणातून पंचतारांकित रांजणगाव औद्योगिक वसाहत, घोडगंगा सहकारी साखर कारखाना, श्रीगोंदा सहकारी साखर कारखाना, तसेच शिरूर, काष्टी व श्रीगोंदा येथे पाणीपुरवठा करण्यासाठी जलवाहिनीद्वारे पाणी नेण्यात आले आहे. शिरूर तालुक्यासह अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा आणि कर्जत या तालुक्यातील मिळून सुमारे २० हजार ५०० हेक्टर क्षेत्र या धरणामुळे सिंचनाखाली आले आहे. 

Related Articles