महापालिका पुन्हा ताब्यात घेण्यासाठी अजित पवार यांची मोर्चेबांधणी   

संजोग वाघेरे राष्ट्रवादीच्या वाटेवर

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिका पुन्हा ताब्यात घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भोसरीतून महेश लांडगे यांच्याशी जोरदार टक्कर दिलेले शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित गव्हाणे यांच्यासह २५ माजी नगरसेवक आणि ४२ बड्या कार्यकर्त्यांनी नुकताच अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. आता मावळ लोकसभा मतदारसंघातून  ठाकरेंच्या शिवसेनेकडून महाविकास आघाडी तर्फे निवडणूक लढवलेले माजी महापौर आणि शिवसेनेचे शहरप्रमुख संजोग वाघेरे आपल्या समर्थकांसह अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहर शिवसेनेत माजी आमदार गौतम चाबुकस्वार वगळता ताकदीचा कोणी नेता  शिल्लक राहणार की नाही असा प्रश्न राजकीय जाणकारांना पडला आहे.
 
लोकसभा निवडणुकीनंतर ठाकरेंच्या शिवसेनेला गळती लागली आहे. जेष्ठ माजी नगरसेविका सुलभा उबाळे यांच्या पाठोपाठ वाघेरे यांच्यासारखे वर्षभरापूर्वीच पक्षात आलेले दिग्गज नेतेही पक्षाला जय महाराष्ट्र करायला लागल्याने शिवसैनिक  अस्वस्थ आहेत. पुढचे पाच वर्षे कुठलेही राजकीय भवितव्य दिसत नसल्याने तसेच नेते, उपनेत्यांचेही संघटनेकडे लक्ष नसल्याने आता ठाकरेंच्या शिवेसेनेकडे थांबायला कोणीही तयार नाहीत. संजोग वाघेरे यांचे वडील भिकु वाघेरे पाटील हेसुध्दा महापौर होते. त्यांच्या निधनानंतर चिरंजीव म्हणून महापौर पदावर संजोग वाघेरे यांना संधी मिळाली. संजोग वाघेरे यांच्या पत्नी उषा वाघेरे या स्थायी समिती अध्यक्ष होत्या. २००९ पासून वाघेरे यांनी मावळ लोकसभा लढविण्यासाठी वेळोवेळी प्रयत्न केला. २०२४ मध्ये महायुतीत मावळ मतदार संघ राष्ट्रवादीच्या वाट्याला येणार नाही हा मतदारसंघ शिवसेना एकनाथ शिंदे गटाला जाणार हे लक्षात घेऊन वाघेरे यांनी अजित पवार यांची साथ सोडली आणि उमेदवारीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. शिंदेंच्या शिवसेनेचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीची मते मिळाल्याने वाघेरे यांचे गणित चुकले, साडेपाच लाख मते मिळाली मात्र, त्यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला. त्यानंतर संजोग वाघेरे यांची शिवसेनेचे प्रभारी शहर प्रमुख पदी  नियुक्ती करण्यात आली होती. मुंबई वगळता शिवसेना नेत्यांचे शहरात लक्ष नसल्याने वाघेरे यांनीही शिवसेनेला जय महाराष्ट्र करायचे ठरवले असल्याचे समजते.

Related Articles