रामाच्या चरणस्पर्शाने अहल्येचा उद्धार   

भावार्थ रामायणातील कथा

विलास सूर्यकांत अत्रे 
 
गौतम आणि अहल्या यांचा संसार सुरळीत चालला असताना, एकदा खग्रास सूर्यग्रहण लागणार होते. सूर्यग्रहण लागले, ते सुटलेही पण अहल्येच्या सुखी संसाराला मात्र त्याच वेळी ग्रहण लागले आणि ते सुटायला पुढील अनेक वर्षे लागली.
 
सूर्यग्रहण सुटल्यावर गौतम आणि अहल्या गंगास्नान करून आले. ग्रहणानंतरचे दान तर्पण इत्यादी करण्यात गौतम मग्न झाला. ग्रहणातील अन्न त्याज्य असते म्हणून अहल्या स्वयंपाकाला लागली. इंद्र संधीच शोधत होता. त्याने ही संधी साधली. त्याने गौतमाचे रूप घेतले. गौतमाच्या रूपात असलेला इंद्र, अहल्येपुढे प्रगट झाला. समोर आलेली व्यक्ती ही गौतम नसून इंद्र आहे हे अहल्येला कळले नाही. तिला तो आपला पती असल्याचेच वाटले. गौतमाच्या रूपात आलेल्या इंद्राने अहल्येकडे विचित्र मागणी केली. त्यासाठी एकांतात जाऊयात असे सांगितले. अहल्येला ती मागणी ऐकून आश्‍चर्य वाटले. अवेळी केलेली ही मागणी तिला विचित्र वाटली. गौतमाच्या वेशातील इंद्राची तिने समजूत काढण्याचा प्रयत्न केला. ती म्हणाली, हा तर पर्वकाळ आहे. पर्वकाळात पितरांना तर्पण करण्याची वेळ असते, ते करण्याचे सोडून ही भलत्यावेळी भलती मागणी चुकीची आहे, असे वागणेे धर्माने निषिद्ध सांगितले आहे. हे पापाचरण आहे‘ असे अनेक प्रकारे सांगून अहल्येने त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला; पण समोर आपला पती गौतम नसून इंद्र आहे, हे त्या अहल्येला समजायला मार्ग नव्हता. इंद्राला अहल्येला वश करायचे होते. त्यामुळे त्याने अहल्येला पतिव्रतेचे लक्षण सांगितले. तो म्हणाला, ‘पत्नीने पतिवचनाचे पालन करणे तिच्यावर बंधनकारक आहे, असे वेद शास्त्रात सांगितलेले आहे. पतिवचन न पाळणे म्हणजे पतिव्रतेचे अध:पतन होय. धर्मशास्त्र तुझ्याकडून शिकायची वेळ माझ्यावर आलेली नाही‘, असे काहीबाही सांगितले. त्याच्या या शब्दांना ती फसली. इंद्राच्या मायाजालात ती अडकली. इंद्राने अहल्येला फसवले.
 
इंद्र मायावी रूपात
 
त्याचवेळी गौतम पितरांना तर्पण इत्यादी करून आश्रमाच्या दाराशी आला. बाजूला असलेला एक गौतम आणि समोरून येणारा दुसरा गौतम पाहून अहल्येला काय घडले आहे याची जाणीव झाली. आपली फसवणूक झाल्याचे तिला समजले. तिचा कोप अनावर झाला. संतापाने इंद्राला शिव्या शाप देत ती म्हणाली, ‘अरे पापी, तू मला फसविलेस. तुझे काळे तोंड परत दाखवू नकोस, या क्षणी तू इथून निघून जा. गौतमाने पाहिले, तर तो तुझी राख रांगोळी करेल‘ असे सांगून त्याला घराबाहेर हाकलून दिले. लज्जित होऊन इंद्र दाराशी आला, तर दारातच गौतम उभा. काय घडले आहे याची कल्पना गौतमाला क्षणार्धात आली. झाल्या प्रकारात अहल्या सामील आहे असे गौतमाला वाटले. गौतमाला समोर पाहून इंद्राने तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला; पण गौतमाने मंत्रसामर्थ्याने त्याला एका जागी खिळवून ठेवले. संतापलेल्या गौतमाने इंद्राला शाप दिला.
 
अत्यंत कोपाने अहल्येकडे त्याने वळून बघितले. आपल्या चारित्र्याबद्दल गौतमाचा गैरसमज झाला, याची अहल्येची खात्री झाली. ती कळवळून गौतमाला म्हणाली, ‘स्वामी मी अगदी निष्पाप आहे, निरपराध आहे. माझी काहीही चूक नाही. इंद्राने मला फसविले. तो तुमच्या रूपात आला. तुमच्या आवाजात बोलला. तरीही मी त्याला हे वागणेे धर्माने निषिद्ध असल्याचे सांगितले होते; पण त्याने पतिव्रतेचे कर्तव्य सांगून माझी फसवणूक केली, तो इंद्र आहे हे मला कळलेच नाही. मी माझ्या मर्जीने हे कृत्य केलेले नाही, इंद्राने तुमचे रूप घेऊन मला फसविल्याने या कृत्यात ती गोवली गेली आहे’.
 
अहल्येने गौतमाला वस्तुस्थिती समजून सांगण्याचा बराच प्रयत्न केला; पण गौतमाचा त्यावर विश्‍वास बसला नाही. अहल्याही यात सामील होती, असे गौतमाला वाटले होते. त्याचा गैरसमज झाला; पण त्यामुळे अहल्येने गौतमाची केलेली विनवणी, केलेली याचना सगळेच व्यर्थ गेले. गौतमाने अहल्येची निर्भर्त्सना केली आणि रागाच्या भरात त्याने अहल्येला शाप दिला की, ‘तू इथे शिळा होऊन पडशील. तुझ्याकडे कुणी बघणार पण नाही. इथे पशुपक्षीसुद्धा फिरकणार नाही. इथला परिसर उजाड होऊन जाईल. या आश्रमाला दैन्यावस्था प्राप्त होईल‘. 
 
आपल्यावर अन्याय झाला, या भावनेने अहल्येला अश्रू अनावर झाले. तिने रडत रडत आपल्यावर अन्याय झाल्याचे व यात आपली काहीही चूक नसल्याचे सांगितले. इंद्राने कसा डाव साधला हे गौतमाच्या नजरेस आणले. इंद्रापासून सावध राहा, ही सूचना ब्रह्मदेवाने गौतमाला लग्नाच्यावेळी दिलेली होती, त्याची आठवण करून दिली. तिने पुन्हा पदर पसरून गौतमाकडे उ:शाप मागितला. 
 
अहल्येची दया, याचना ऐकून गौतमाचा जीव कळवळला. ती निर्दोष असल्याचे त्याला मनोमन जाणवले. तथापि त्याने शाप तर दिलेला होता. तो खोटा होणार नव्हता. गौतमाने म्हणून अहल्येला उ:शाप दिला की, ‘तू जरी शिळा झालीस तरी तुझा उद्धार होईल. या शापातून तू मुक्त होशील. रामाचे या वनात येणे होणार आहे. राम इथे येईल त्यावेळी इथून जाताना त्याचे चरण शिळा झालेल्या तुला लागतील, त्या चरण स्पर्शाने तुझा उद्धार होईल. रामच तुझा उद्धार करेल. तोपर्यंत तू अखंड राम नामाचा जप करीत राहावेस‘. 
 
गौतमाचे तपाचरण
 
गौतमाने अहल्येला उ:शाप दिला. आपला आश्रम सोडून तो बाहेर पडला आणि त्याने मागे वळून पाहिले तर, अहल्या शिळा होऊन पडली. आश्रमाचा सर्व परिसर उजाड, रखरखीत झालेला. आश्रमाला अवकळा आलेली. हे पाहून क्रोधित असलेल्या गौतमाचा क्रोध पूर्णपणे मावळला. त्याची विवेकबुद्धी जागी झाली. क्रोधाची जागा पश्‍चात्तापाने घेतली. त्याला स्वत:चा उद्वेग आला, ’मी, माझे हा मीपणा आपल्यातला गेलाच नाही. आपले नाव गौतम आहे. हे नाव त्रिलोकात पावन, पवित्र, म्हणून गाजते आहे; पण या क्रोधाने आपले अध:पतन झाले आहे. या क्रोधाने, वासनेने, कामाने मला या गौतमाला नाडले, हे मी कुणाला सांगावे? वासनेला जे वश होतात ते निदान भोग तरी उपभोगतात. ज्याला क्रोधाने वश केले आहे, तो भोगही भोगत नाही आणि मोक्षही गमावून बसतो’ या भावनेने तो मनात तळमळू लागला. गौतमाला आपण केलेल्या कृत्याचा पश्‍चात्ताप झाला आणि या क्रोधाला जिंकण्यासाठी तो मेरू पर्वतावर तपाचरणास जाऊन बसला.
 
इकडे इंद्राची परिस्थिती बिकट झाली होती. त्याच्या सर्वांगाला भोके पडली. हे बिभत्स रूप घेऊन त्या इंद्र (देव)लोकी जाण्याची त्याला लाज वाटू लागली. जगाला तोंड दाखवणे नकोसे झाले. आयुष्य म्हणजे मरण यातना वाटू लागल्या. जगापासून तोंड लपवायचे म्हणून तो मोराच्या रूपात वावरू लागला. इंद्राचा थांगपत्ता लागत नसल्यामुळे देवलोकात हलकल्लोळ झाला.  देव, ऋषिमुनी सगळेच जण त्याचा शोध घेऊ लागले. शोध घेता घेता त्यांना कळले की, जगापासून तोंड लपविण्यासाठीे इंद्र मोराच्या रूपात वावरत आहे. 
 
देवांनी आणि ऋषिमुनींनी इंद्राची भेट घेतली आणि त्याला सांगितले की, तू गौतमाकडे जा त्यांची याचना कर, क्षमा माग आणि उ:शाप माग. एवढे करून न थांबता इंद्राला घेऊन ते गौतमाकडे गेले. सर्वांनी गौतमाकडे क्षमा याचना मागितली. गौतमाचा राग निवळला होता. त्यामुळे त्याने इंद्राला उ:शाप दिला, की त्याच्या देहावरील सर्व भग हे डोळे होतील. इंद्र त्यावेळी मोराच्या रूपात होता; मात्र उ:शाप ऐकून मोर रूपातील इंद्र आनंदातिरेकाने पिसारा फुलवून नाचू लागला. त्याच्या सर्वांगावरील भग हे मोराच्या पिसांवरील डोळे झाले. गौतमाने नंतर गजाचे (हत्तीचे) वृषण इंद्राला दिले. त्यामुळे मोरासारखीच हत्तीची अवस्था झाली. मोर आणि गज यांच्या वंशवृद्धीसाठी वेगळी सोय गौतमाने केली. हत्तीचे वृषण इंद्राला मिळाल्याने इंद्र बलवान झाला. शक्तिशाली झाला. हत्तीमुळे इंद्राला वैभव प्राप्त झाले. कृतज्ञ असलेल्या इंद्राने हत्तीचा महिमा वाढविला. त्याला राज्यप्राप्ती करून दिली. हत्तीला राजवैभव मिळाले. त्याच्या पायाशी लक्ष्मी खेळू लागली. त्यामुळेच हत्तीसारखे ज्याला भाग्य मिळते त्या भाग्याला गजांतलक्ष्मी असे म्हणतात. 
 
आश्रमाचाही उद्धार
 
रामाने अहल्येची ही सगळी कथा ऐकली. आश्रमात शिरून त्याने शिळेचा शोध घेण्यास सुरुवात केली. आश्रमात शिळा सापडली नाही. श्रीराम आश्रमाभोवती शोध घेत फिरत असताना त्याचा पाय नकळत एका शिळेला लागला आणि शिळा झालेल्या अहल्येचा उद्धार झाला. शिळेतून अहल्या प्रगट झाली. रामनामाने तिचा उद्धार झाला होता. होते ते आपल्या भल्यासाठीच अशी तिची भावना झाली. इंद्राच्या मनात पाप आले नसते, तर त्याने व्यभिचार केला नसता. त्याने व्यभिचार केला नसता, तर ऋषींनी शाप दिला नसता. ऋषींनी शाप दिला नसता, तर रामनामाचा जप घडला नसता. मग रामचंद्र कसा भेटला असता आणि आपला उद्धार कसा झाला असता? अहंभावाचे सपरिवार म्हणजे मद, मोह, माया, मत्सर, असुया, द्वेष, अगदी देह भावासह सगळ्याचे रामाने निर्दलन केले आहे, असे म्हणून ती रामाची स्तुती करू लागली. अहल्येचा उद्धार झाल्याची गोष्ट ज्ञानशक्तीच्या बळावर गौतमाला समजली आणि तो वेगाने आश्रमापाशी आला. अहल्येसारखाच आश्रमाचाही उद्धार झाला होता. त्यालाही पूर्व वैभव प्राप्त झाले होते. गौतमानेही रामाची मनोभावे पूजा केली. रामामुळे दोघांचा अहंपणा संपला, त्यांना समदृष्टी मिळाली आणि त्यांचे पुनर्मीलन झाले.
(आधार संत एकनाथकृत भावार्थ रामायण बालकांड अध्याय 14)

Related Articles