गाझात अन्नासाठी मारामार्‍या   

जमावावर गोळीबार, चोरट्यांचाही सुळसुळाट

गान युनूस (गाझा पट्टी) : गाझा पट्टीत अन्नासाठी मारामार्‍या सुरू झाल्या आहे. इस्रायली सैन्याच्या तुकड्या लष्कराच्या संरक्षित भागात अन्नपदार्थ आणि मदत घेण्यासाठी आलेल्या पॅलेस्टिनी नागरिकांवर गोळीबार करत आहेत. दुसरीकडे नागरिकांनी गोळा केलेले अन्नपदार्थ आणि पाण्याच्या बाटल्यांची चोरी करणारे चोरटे हातात चाकू घेऊन त्यांच्यावर तुटून पडत असल्याने परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. 
 
पॅलेस्टिनी कुटुंबे अन्नपदार्थांच्या पाकिटांवर तुटून पडत आहेत. त्यामुळे परिसरात गोंधळ निर्माण झाला आहे. काहीजण त्यातूनही अन्नधान्यांची पाकिटे प्राप्त करण्यात यश मिळवत आहेत. अनेक जणांना निराश होऊन परतावे लागत आहे. एकूणच गोंधळ घालणार्‍या जमावावर इस्रायली सैनिकांच्या तुकड्या  गोळीबार करत आहेत. गाझातील मानव फौंडेशनतर्फे मदत केंद्रे उघडली आहेत. त्यांना इस्रायलचे खासगी कंत्राटदार  त्यांना मदत करत आहेत. या गोंधळाचा फायदा चोरटे घेत आहेत. चाकूचे वार करून नागरिकांच्या हातातून पाकिटे पळवली जात आहे. त्यामुळे सर्वत्र गोंधळाचे वातावरण तयार झाले आहे. अनेक जण झटापटीत जखमी झाले आहेत. मदत केंद्रातील कर्मचारी नागरिकांच्या तोंडावर पाकिटे फेकत आहेत. एक सुरक्षा रक्षकाने एकाच्या तोंडावर मिरची पावडर फेकली. त्यामुळे ही खरोखच मानवी मदत आहे का ? अशी खंत अनेकांनी व्यक्त केली. अन्नाची पाकिटे मिळत नसल्याने मुलांना खायला काय द्यायचे ? असा प्रश्न कुटुंबासमोर निर्माण झाला आहे, असे एका कुटुंबातील सदस्याने सांगितले. 
 
मदत साहित्याचे वाटप गेल्या महिन्यात सुमारे दहा आठवड्यानंतर सुरू केले होते. त्यासाठी संयुक्त राष्ट्राने पुढाकार घेतला होता; परंतु अजूनही नागरिकांचे पोट भरण्याएवढी मदत करण्यात अपयश आल्याची खंत अधिकार्‍यांनी व्यक्त केली. अनेक मदत केंद्रे इस्रायल लष्कराच्या संरक्षित जागेत आहेत. तेथे मदत घेण्यासाठी हजारोंच्या संख्येने पॅलेस्टिनी नागरिक येत आहेत. पण, अनेकांच्या पदरी निराशा पडत आहे. अन्नाच्या पॅकेटवर तुटून पडल्यामुळे गोंधळ उडत असल्याने जमावाला पांगवण्यासाठी सैनिक गोळीबार करतात. त्यात शेकडो जण जखमी झाले आहेत. नुकत्याच झालेल्या गोळीबारात ५० नागरिक जखमी झाले होते.

Related Articles