आळंदी देवस्थानच्या विश्वस्तांची मंदिरात अरेरावी   

पोलिस, प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी, वारकर्‍यांसोबत उद्धट वर्तन 
 
पुणे : आळंदी संस्थानचे विश्वस्त निरंजन नाथ यांनी वारकरी, माध्यमांचे प्रतिनिधी आणि पोलिस यांच्याशी अरेरावी आणि उद्धट वर्तन केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांची पादुका भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात दाखल झाल्यानंतर हा प्रकार घडला आहे. निरंजन नाथ यांचा मंदिरात अरेरावी करत असल्याचा व्हिडिओही समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. त्यामुळे वारकरी आणि भाविकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
 
प्रसारित झालेल्या व्हिडिओमध्ये निरंजन नाथ हे मंदिर परिसरात पालखी आल्यानंतर उद्धटपणे वर्तन करताना दिसत आहेत. पोलिसांना, माध्यम प्रतिनिधींनी तसेच वारकरी आणि भाविकांवर ओरडताना दिसत आहेत. त्यांच्या या वागणुकीबद्दल सगळ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. पालखी भवानी पेठेत असताना हजारो भाविक, वारकरी तेथे उपस्थित असतात. पोलिसांना याठिकाणी कडक बंदोबस्त ठेवावा लागतो. त्यामुळे त्यांनाही आतमध्ये थांबावे लागते. परंतु निरंजन नाथ यांनी विचित्र हातवारे करत पोलिसांवरच अरेरावी केल्याचे व्हिडिओतून समोर आले आहे.
 
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि संत जगद्गुरू तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा शुक्रवारी शहरात दाखल झाला. शनिवारी दोन्ही पालख्या शहरात मुक्कामी होत्या. या दोन्ही पालख्यांचे आज (रविवारी) सकाळी हडपसरकडे प्रस्थान होणार आहे. या पालखी सोहळ्यासाठी काल लाखो वारकरी, तसेच भाविक शहरात मुक्कामी होते. यासाठी पुणे पोलिसांकडून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी, वारकर्‍यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी विशेष बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात मुक्कामी होती. त्याच मंदिरात निरंजन नाथ यांनी पोलिसांसोबत अरेरावीची वागणूक आणि उद्धटपणाचे वर्तन केल्याचा प्रकार घडला. या प्रकारामुळे वारकर्‍यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
 
मुख्यमंत्री करणार चर्चा 
 
पुण्यात पालखी मुक्कामी आल्यानंतर मंदिरात घडलेल्या या घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा दखल घेतली आहे. पालखी सोहळा आनंद, उत्साह, शांतता अन् आनंद देणारा सोहळा आहे. अशा घटना अजिबात घडू नये. आम्ही संबंधित विश्वस्तांशी चर्चा करू. तसेच इथून पुढे असे प्रकार घडणार नाहीत  याचीही काळजी घेण्यास सांगू, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. 

Related Articles