घरकुलाच्या अनुदानासाठी ६५ हजार कोटींचे वितरण : गोरे   

पुणे : मागील १० वर्षांत सर्व घरकुल योजनांना एकत्र केल्यास १३ लाख घरे मंजूर झाली होती; मात्र आमच्या सरकारने चालू वर्षी ३० लाख घरकुलांना मंजुरी दिली आहे. त्यामुळे मागील सर्व अनुशेष भरून काढण्यात आला आहे. घरकुलाच्या अनुदानासाठी ६५ हजार कोटी रुपये वितरित करण्यात आल्याची माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.
 
निर्मलवारी, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान व महाआवास अभियान पुरस्काराचे वितरण गोरे यांच्या हस्ते शनिवारी झाले, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालिका शालिनी कडू आदि उपस्थित होते.
 
गोरे म्हणाले, देशातील प्रत्येक व्यक्तीला घर मिळावे, ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका आहे. एकही व्यक्ती घराशिवाय राहू नये, ही त्यांची कटीबद्धता आहे. अनेक कुटुंबाची १० वर्षांपासून प्रतिक्षा सुरू होती. दरवर्षी गावातील फक्त दोन ते तीन घरकुले मंजूर होत होती; मात्र महायुती सरकारच्या काळात एका गावात १०० ते १५० घरकुलांना मंजुरी दिली जात आहे.ज्यांच्याकडे जागा आहे, त्यांना घरकुल मंजूर करणे हे सरकारचे नियमित कर्तव्य आहे; परंतु ज्यांच्याकडे घरांसाठी जागा नाही, त्यांना जागा उपलब्ध करून देणे हे खरे पुण्याचे कार्य आहे, असे गोरे म्हणाले. 
 
गोरे म्हणाले, महाराष्ट्रातील संतांनी स्वच्छतेच्या क्षेत्रात दिलेले योगदान अनुकरणीय आहे. आपली सुरुवात हागणदारीमुक्त गावापासून झाली असून आता अनेक गावे स्वच्छ व सुंदर झाली आहेत. प्लास्टिक स्वच्छ-सुंदर महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी सर्वांनी मिळून काम करणे गरजेचे आहे.
वारकर्‍यांसाठी सरकारने कोणतीही अडथळ्याची मोजपट्टी लावलेली नाही. त्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. विठ्ठलासमोर सर्वजण समान आहेत. त्यामुळे आषाढी एकादशीपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्यात आले आहे. मंत्र्यांनाही चालत जावे लागणार आहे. संपूर्ण पंढरपूर शहर स्वच्छ ठेवले जाईल. कचर्‍याचा एकही तुकडी कुठेही दिसणार नाही, अशीही ग्वाही गोरे यांनी दिली.
 
गोरे म्हणाले, ग्रामविकास विभागाने आषाढी वारीच्या अनुषंगाने सर्व व्यवस्था उभ्या केल्या आहेत. पंढरपूरला दर्शनासाठी येणारा प्रत्येक जण व्हीआयपी आहे. त्यामुळे आषाढी एकादशी होईपर्यंत सर्व व्हीआयपी दर्शन बंद करण्यात आले आहे. सर्व मंदिर परिसर वाहनमुक्त केला आहे. ३ हजार स्वयंसेवकांच्या माध्यमातून पंढरपूरमध्ये उद्या (२२ जून) महास्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. वारकर्‍यांसाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पालखी तळ व मार्गावर स्वच्छतेवर भर देण्यात आला आहे. ७ लाख रेनकोटची व्यवस्था करण्यात आली आहे.
 
यावेळी विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी स्वच्छतेची माहिती विषद केली. मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी वारकर्‍यांसाठी करण्यात आलेल्या सुविधांची माहिती दिली.महाआवास योजनेतंर्गत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत आवास योजना सर्वोत्कृष्ट जिल्हे, तालुके, ग्रामपंचायती यांना पुरस्कार देण्यात आला.यावेळी स्वच्छ सर्वेक्षण लोगोचे, पुणे जिल्हा परिषदेने तयार केलेली पालखी सोहळा माहिती पुस्तिका, तसेच वारी सुविधा व टॉयलेट अ‍ॅपचे मंत्री गोरे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

Related Articles