पादुका दर्शनासाठी लोटला जनसागर   

पुणे : संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराजांच्या पादुकाच्या दर्शनासाठी  नाना पेठ आणि भवानी पेठेत शनिवारी जनसागर लोटला होता. पहाटेपासूनच भक्तांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. लाखो भक्तांनी रांगेत थांबून पालख्यांतील पादुकांचे मनोभावे दर्शन घेतले. पादुकांचे दर्शन घेताच कृतकृत्य झाल्याचे भाव भक्तांच्या चेहर्‍यांवर जाणवत होते. रात्री उशिरापर्यंत दर्शनासाठी रांगा कायम होत्या. 
 
पहाटेपासूनच नाना पेठ आणि भवानी पेठेतील रस्त्यावर अलोट गर्दी झाली होती. दरवर्षीच पालख्या पुण्यात दाखल झाल्या की, शहर, उपनगर तसेच जिल्ह्यातून भक्त पादुका दर्शनासाठी पुण्यात दाखल होत असतात. ज्ञानोबा-तुकोबांच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी लहान-थोर सकाळपासून रांगेत उभे होते. ठिकठिकाणी वारकर्‍यांच्या मुखातून घुमणार्‍या ‘माउली’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता. त्यात दर्शनासाठी आलेले भाविकही मनोभावे ज्ञानोबा-तुकोबांच्या नावाचे मनन करीत होते. त्यामुळे परिसरातील भक्तिमय वातावरण शिगेला पोहोचले होते. डोक्यावर टोपी आणि कपाळी टिळा लावून तरुणाईही परिसरात मोठ्या संख्येने वावरत असल्याचे चित्र पाहण्यास मिळत होते. 
 
संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या शुक्रवारी रात्री उशिरा शहरात दाखल झाल्या. दोन्ही पालख्यांसोबत लाखो वारकर्‍यांच्या आगमनामुळे संपूर्ण शहरात चैतन्यमय वातावरण होते. शहरातील भवानी पेठ याठिकाणी संत ज्ञानेश्वरांची, तर नाना पेठेमध्ये संत तुकाराम महाराजांची पालखी मुक्कामी होती. दिंड्यांमध्ये आलेल्या वारकर्‍यांकडून दिवसभर कीर्तन, भजन, हरिपाठाचे मनन करण्यात येत होते. वारकर्‍यांसाठी ठिकठिकाणी चहा, फराळाची सोय करण्यात आली होती. तर मोफत चपला शिवून देणे, जेवण, रेनकोट वाटप असे उपक्रम विविध संस्था, मंडळांकडून सुरू होते. शनिवारी रात्रीपासून भक्त नाना पेठ, तसेच भवानी पेठेत पालख्यांच्या दर्शनासाठी येत आहेत. त्यामुळे राजकीय पक्ष, सामाजिक संस्था, मंडळांकडून वारकर्‍यांचे स्वागत करणारे फलक लावण्यात आले आहेत. दर्शनासाठी आलेले भक्त कीर्तनात रंगत होते. वारकर्‍यांच्या सुरक्षिततेसाठी परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मंदिर परिसरात सीसीटीव्हीद्वारे हालचालींवर करडी नजर ठेवण्यात आली होती. ठिकठिकाणी थांबून पोलिस टेहळणी करीत होते. 
 
रविद्युत रोषणाईने मंदिर परिसर उजळला
 
पालख्यांच्या आगमनामुळे नाना पेठेतील श्री निवडुंगा विठ्ठल मंदिर आणि भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तसेच मंदिर परिसरातील रस्त्याच्या दुतर्फा विद्युत रोषणाई करण्यात आली होती. सायंकाळी, तसेच रात्री विद्युत रोषणाईमुळे वातावरणात अधिकच प्रसन्नता निर्माण झाली होती. पालख्यांप्रमाणेच आकर्षक विद्युत रोषणाईही भक्तांचे आकर्षण ठरली. रात्रीच्या अंधारात लकाकणार्‍या या विद्युत रोषणाईने मंदिर परिसर उजळून निघाला होता.

Related Articles