अग्निशमन दल भाविकांच्या सेवेसाठी सज्ज   

मुक्कामी स्थळावर जवान तैनात 

पुणे : संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यादरम्यान कुठेही अनुचित प्रकार घडू नये, याकरिता अग्निशमन दल ठिक-ठिकाणी सज्ज झाले आहेत. पालखी मुक्कामाच्या ठिकाणी अग्निशमन जवान तैनात करण्यात आले आहेत. पालखी सोहळ्यात संभाव्य दुर्घटना विचारात घेऊन पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान यंदाही पालखी सोहळ्यात सहभाग झाले आहेत. 
 
श्रीक्षेत्र पंढरपूरपर्यंत ही सेवा असणार आहे. दरवर्षी पालखी सोहळ्यात लाखो वारकरी सहभागी होत असतात. दरम्यान, आगीसारखी एखादी दुर्घटना घडल्यास त्वरीत मदत उपलब्ध व्हावी, हा या सेवेचा मुख्य उद्देश आहे. यामध्ये अग्निशमन दलाचे एक वाहन, एक अधिकारी आणि सहा जवानांचा समावेश आहे. संत ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा शुक्रवारी शहरात दाखल झाला. विश्रांतवाडी, खंडोजीबााबा चौक, तसेच पालखी मुक्कामी नाना-भवानी पेठेत अग्निशमन दलाचे जवान आणि बंब तैनात करण्यात आले आहे. 
  
 या पालख्या शहरातून मार्गस्थ झाल्यानंतर हडपसर भागात अग्निशमन दलाचे जवान तैनात असणार आहेत, असे अग्निशमन दलाचे प्रभारी अधिकारी कैलास शिंदे सांगितले. दरम्यान, आपत्कालिन परिस्थिती निर्माण झाल्यास अग्निशमन अधिकारी कैलास शिंदे (८२०८९५६३१६) जवान अजितकुमार शिंदे (८८०५९८८०३९) आणि राजू शेलार (९९२२४२६६००) यांच्या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles