इस्रायल-इराण युद्धाचा भारतीय बासमतीला फटका   

मध्यपूर्वेत इस्रायल आणि इराणमधील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. या दोन्ही देशांमधील संघर्षाचा परिणाम भारतीय बासमती तांदळावर झाला आहे. आर्थिक वर्ष २०२५ मध्ये भारतीय बासमती तांदळाच्या निर्यातीत इराण आणि इस्रायलचा वाटा १४ टक्के आहे. या दोन्ही देशांतील युद्धामुळे तांदळाची निर्यात थांबली आहे. 
 
एक लाख मेट्रिक टन तांदूळ बंदरावर
 
इराण आणि इस्रायलमधील सुरू असलेल्या युद्धाचा भारतातील तांदूळ निर्यातदारांवर परिणाम झाला आहे. या संघर्षामुळे इराणमार्गे होणारी तांदळाची निर्यात थांबली आहे, ज्यामुळे हरयाना, पंजाब, दिल्ली आणि उत्तर प्रदेशातून निर्यात होणारा सुमारे १ लाख मेट्रिक टन तांदूळ बंदरांवर अडकला आहे. त्यामुळे आर्थिक व्यवहारही ठप्प झाला आहे. 
 
निर्यातदार चिंतेत
   
जर येत्या काळात आपण इराणला तांदूळ निर्यात करू शकलो नाही, तर आपण पुढील भाताचे पीक घेऊ शकणार नाही. कारण तांदळाचा शिल्लक साठा असताना नवीन उत्पादन घेतल्यास धानाच्या किमतीत आणखी मोठी घसरण होईल. सध्या बंदरात सुमारे ४ हजार कंटेनर अडकून पडले आहेत, असे निर्यातदारांनी म्हटले आहे.  
 
इराण, सौदी आणि इराक प्रमुख आयातदार 
 
कैथल येथील तांदूळ निर्यातदार गौतम मिगलानी म्हणाले, भारत बासमती तांदळाच्या ३० टक्क्यांहून अधिक निर्यात इराणला करतो, तो भारतीय तांदळाचा सर्वात मोठा आयातदार आहे. भारतातून तांदूळ आयात करण्यात सौदी अरेबिया दुसर्‍या क्रमांकावर आहे तर इराक तिसर्‍या क्रमांकावर आहे. 
सौदी आणि इराकच्या निर्यातीवरही परिणाम  
   
 युद्धामुळे भारतातून सौदी अरेबिया आणि इराकला पाठवल्या जाणार्‍या तांदळावरही परिणाम झाला आहे. याचा परिणाम लहान व्यापारी आणि शेतकरी दोघांवरही होत आहे. ज्या शेतकर्‍यांना पूर्वी प्रति क्विंटल ३६०० रुपये भाव मिळत होता, त्यांना आता त्याच तांदळासाठी ५०० रुपयांपर्यंत कमी भाव मिळत आहे. 
 
जागतिक व्यापारात भारताचा वाटा ४० टक्के
  
 भारत सरकारच्या आकडेवारीनुसार, जागतिक तांदळाच्या व्यापारात भारताचा वाटा ४० टक्के आहे. यापैकी ६० टक्के तांदूळ आखाती देशांमध्ये जातो. ४० टक्के बासमती तांदळाची निर्यात हरयानामधून केली जाते. उर्वरित ६० टक्के पंजाब, दिल्ली आणि उत्तर प्रदेशकडून होते. जर युद्ध दीर्घकाळ चालू राहिले तर त्याचा परिणाम संपूर्ण कृषी व्यापारावर होईल.
 
आणखी कोणते क्षेत्र प्रभावित होऊ शकते? 
 
भारतीय बासमती तांदळाव्यतिरिक्त, खते आणि पॉलिश केलेले हिरे यासारख्या इतर क्षेत्रांवरही काही परिणाम दिसू शकतो; परंतु बासमती तांदळाच्या तुलनेत तो कमी असेल. गेल्या वर्षी देशांतर्गत हिरे पॉलिश करणार्‍या कंपन्यांच्या एकूण हिर्‍यांच्या निर्यातीत इस्रायलचा वाटा जवळपास ४ टक्के होता, त्यामुळे इस्रायल हे प्रमुख व्यापारी केंद्रांपैकी एक बनले. तथापि, इस्रायल-इराण तणावामुळे  व्यापारी बेल्जियम आणि संयुक्त अरब अमिरातीकडे पर्यायी व्यापारी केंद्र म्हणून पाहू शकतात. 
 
तांदळाच्या किंमतीत मोठी घसरण 
 
युद्धामुळे निर्यात केलेल्या तांदळाच्या किमती प्रति क्विंटल १२०० रुपयांनी कमी झाल्या आहेत. निर्यातदारांना सर्वात मोठी चिंता इराणमध्ये अडकलेल्या त्यांच्या तांदळाच्या पैशांची आणि बंदराच्या उभ्या असलेल्या तांदळाच्या कंटेनरची आहे. कारण इराणमधून निर्यात होणार्‍या तांदळाचा कोणताही विमा नाही, त्यामुळे निर्यातदारांना आता कोट्यवधी रुपयांचा तांदूळ खराब होण्याची चिंता आहे. दुसरीकडे, इराणला तांदूळ निर्यात करण्याची परवानगी फक्त चार महिन्यांसाठी दिली जाते, ज्यामध्ये निर्यातदारांना निर्धारित वेळेत तांदूळ पोहोचवावा लागतो. जर तांदूळ वेळेवर पोहोचला नाही तर परवाना रद्द केला जातो. यामुळे निर्यातदारांचे नुकसान होते.

Related Articles