खलिस्तानी कॅनडात रचताहेत भारतविरोधी कारस्थान   

गुप्तचर यंत्रणेच्या अहवालात उघड

नवी दिल्ली : खलिस्तानी दहशतवादी कॅनडात राहून भारतात हिंसाचार घडविण्यासाठी कारस्थान रचत आहेत. कॅनडा हे खलिस्तान्यांसाठी आश्रयस्थान बनल्याचे कॅनेडियन सिक्युरिटी इंटेलिजेंस सर्व्हिसच्या अहवालातून समोर आले आहे. 
 
स्वतंत्र खलिस्तानची मागणी करणारे खलिस्तानी दहशतवादी कॅनडाचा वापर भारतात हिंसाचाराला प्रोत्साहन देण्यासाठी, निधी उभारण्यासाठी आणि नियोजन करण्यासाठी करत आहेत. मागील आठवड्यातच भारताविरोधात रचलेले   कारस्थान कॅनडातील पील प्रादेशिक पोलिसांनी उघड केले होते. पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय आणि मेक्सिकनमधील अमली पदार्थ विक्रीच्या साखळीशी या खलिस्तानी दहशतवाद्यांचे संबंध आहेत. विशेष म्हणजे या अमली पदार्थ विक्रीतून मिळालेले पैसे भारतविरोधी कारवायांमध्ये वापरले जात असल्याचेही उघड झाले आहे.
 
दरम्यान, कॅनडाच्या गुप्तचर संस्थेने त्यांच्या २०२४ च्या वार्षिक अहवालात पहिल्यांदाच यासंदर्भातील खुलासे केले आहेत. कॅनडाने पहिल्यांदाच ’अतिरेकी’ हा शब्द वापरुन खलिस्तानी चळवळीला दहशतवादी चळवळ म्हणून स्वीकारले आहे. १९८५ च्या एअर इंडिया बॉम्बस्फोटानंतर पहिल्यांदाच सरकारी पातळीवर खलिस्तानींविरुद्ध इतके स्पष्ट शब्द वापरले गेले आहेत.

Related Articles