इस्रायलमधील रुग्णालयावर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला   

रुग्णालयाचे मोठे नुकसान; ४० जखमी

तेहरान : इस्रायल आणि इराणमधील लष्करी संघर्षाची व्याप्ती वाढत चालली आहे. इराणने दक्षिण इस्रायलमधील मुख्य रुग्णालयास गुरुवारी लक्ष्य केले. इराणच्या क्षेपणास्त्रामुळे रुग्णालयाचे मोठे नुकसान झाले. यामध्ये जीवितहानी झाली नाही. मात्र, किमान ४० जण जखमी झाले, असे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.इराणची काही क्षेपणास्त्रे तेल अवीवमधील एका बहुमजली इमारतीसह निवासी इमारतींवर पडली.दक्षिणेकडील बिअरशेबा येथील सोरोका वैद्यकीय रुग्णालयावर इराणने क्षेपणास्त्र डागले. क्षेपणास्त्राने लक्ष्य भेदताच मोठा आवाज आला आणि अवकाशात मोठा धूर दिसू लागला. त्यानंतर, रुग्णालय आणि परिसरात एकच खळबळ माजली. आपत्कालीन पथकांनी  रुग्णालयाकडे धाव घेत रुग्णांना तातडीने बाहेर काढले.
 
इस्रायल आणि इराणमधील लष्करी संघर्षाचा काल सातवा दिवस होता. दोन्ही बाजूकडून जोरदार क्षेपणास्त्रांचा मारा केला जात आहे. वॉशिंग्टन येथील एका इराणी मानवाधिकार संघटनेच्या मते, इराणमध्ये २६३ नागरिकांसह किमान ६३९ जण मारले गेले आहेत, तर १३०० हून अधिक जण जखमी झाले आहेत.
 
इराणने प्रत्युत्तरादाखल क्षेपणास्त्रावर सुमारे ४०० क्षेपणास्त्रे आणि शेकडो ड्रोन डागले. या हल्ल्यात इस्रायलमध्ये २४ जण मारले गेले. तर, शेकडो जण जखमी झाले आहेत.इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची आज (शुक्रवारी) जिनेव्हाला जाणार आहेत. तसेच, युरोपीय महासंघाच्या परराष्ट्र मंत्र्यांसमवेत बैठक करणार आहेत. या बैठकीत अमेरिका, फ्रान्स आणि जर्मनीचे परराष्ट्र मंत्री आणि युरोपीय महासंघाचे राजदूत सहभागी होणार आहेत.
 
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला बिनशर्त शरण येण्यास सांगितले आहे. इस्रायल-इराण संघर्षात मी कोणते पाऊल उचलेल, हे मलाच माहीत नाही, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. त्यामुळे, अमेरिका उभय देशांच्या संघर्षात कधीही उडी मारू शकतो. दुसरीकडे, इराणने देखील अमेरिकेला थेट इशारा दिला आहे. अमेरिका संघर्षात उतरली तर गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असे इराणने म्हटले आहे.
 
इराणने क्षेपणास्त्र डागलेले रुग्णालय इस्रायलमधील मुख्य रुग्णालयांपैकी एक आहे. या रुग्णालयात १ हजारांहून अधिक बेडची सोय आहे. हे रुग्णालय १० लाखांहून अधिक नागरिकांना सेवा देते. क्षेपणास्त्राचा मारा होताच रुग्णालयात सायरन वाजू लागले. त्यानंतर, रुग्णांमध्ये मोठी खळबळ माजली. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी रुग्णालयावरील हल्ल्याचा निषेध केला. तसेच, इराणला याची किंमत चुकवावी लागेल, असा इशारा दिला. आम्ही तेहरानमधील जुलमी लोकांकडून संपूर्ण किंमत वसूल करू, असेही त्यांनी म्हटले आहे.इराणने इस्रायलवर शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन डागले आहेत. यातील बहुतेक इस्रायलच्या हवाई संरक्षण यंत्रणेने उद्ध्वस्त केले आहेत.
 

Related Articles