धरण क्षेत्रांत मुसळधार   

चोवीस तासांत वाढले दोन टीएमसी पाणी 

नद्या, ओढ्यांना पूर; काही गावांचा संपर्क तुटला

पुणे : पुण्याला पाणी पुरवठा करणार्‍या चारही धरण क्षेत्रांत मुसळधार पाऊस कोसळत आहे. मागील २४ तासांत पावसामुळे २ टीएमसीपेक्षा अधिक पाणी धरणात साठले आहे. धरण क्षेत्रांतील नद्या आणि नाल्यांना पूर आला असून काही गावांचे मार्ग बंद झाले आहेत. तर, काही गावांचा जगाशी संपर्क तुटला आहे. 
 
खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरण क्षेत्रात मुसळधार ते अतिजोरात पाऊस पडत आहे. काल चार धरणांत तब्बल ५७० मिमी पावसाची नोंद झाली. तर, ६.६८ टीएमसी पाठी साठले. खडकवासला धरण ८५ टक्क्यांपेक्षा अधिक भरले आहे. बुधवारी रात्री सुरू झालेला पाऊस गुरूवारी दिवसभर सुरूच होता. त्यामुळे पहाटेपासूनच धरण क्षेत्रातील नद्यांना तसेच ओढ्यांना पूर आला. काही ठिकाणचे रस्ते पाण्याखाली गेल्याने रहदारी बंद झाली. त्यामुळे ठिकठिकाणी नागरिक अडकून पडले.
 
पुणे आणि कोकणाच्या सीमेवर असलेल्या सह्याद्री डोंगर रांगावर अतिजोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे डोंगर रांगातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून येत आहे. आज (शुक्रवारी) धरणांतील पाणी साठ्यात मोठी वाढ होणार असल्याचा अंदाज आहे. धरण क्षेत्रात अनेक ठिकाणी झाडे पडल्याच्या घटना घडल्या आहेत. पावसामुळे शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. 
 
पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरण क्षेत्रातील नागरिकांना पावसामुळे काल दिवसभर घराबाहेर पडता आले नाही.खडकवासला धरण ८५ टक्क्यांपेक्षा अधिक भरले आहे. त्यामुळे काल दुपारी धरणातून मुठा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. मुठा नदीला मिळणारे नालेही दुथडी भरून वाहत होते. त्यामुळे मुठा नदीपात्रातील पाण्याची पातळी काल मोठ्या प्रमाणात वाढली होती. पाणी सोडण्याआधी जलसिंचन विभाग, महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि पोलिसांकडून नदीपात्र लगतच्या नागरिकांना दक्षतेचा इशारा देण्यात आला होता. शिवणे-नांदेड गावाला जोडणारा पूल पाण्याखाली गेला. तर डेक्कन परिसरातील बाबा भिडे पुल पाण्याखाली गेला. नागरिकांनी नदीपात्रातील वाहने काढून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वारकर्‍यांनी नदीपात्रात उतरु नये. यासाठी बंदोबस्त वाढविण्यात येणार आहे. आजही (शुक्रवारी) धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज आहे, त्यामुळे धरणातून अधिक प्रमाणात पाणी सोडण्यात येऊ शकते. 

२४ तासात धरण क्षेत्रात पडलेला पाऊस

धरण पाऊस टीएमसी टक्केवारी
खडकवासला      ८६ मिमी १.६६ ८३.९५
पानशेत        १७१ मिमी २.४६ २३.१३
वरसगाव       १५८ मिमी ४.१६ ३२.४५
टेमघर      १५५ मिमी ०.४० १०.८४
एकूण      ५७० मिमी ६.६८ २९.७८

खडकवासला धरणातून पाणी सोडले

धरण क्षेत्रात बुधवारपासून जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे खडकवासला धरण ८४ टक्के भरले असून काल रात्री धरणातून १५ हजार क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले. त्याआधी सायंकाळी ७ वाजता ८,७३४ क्युसेक वेगाने, सायंकाळी ६ वाजता ४,३४५ क्युसेक वेगाने तर दुपारी १ वाजता १,९२० क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले होते. नदीपात्रात पाणी सोडल्यामुळे डेक्कन परिसरातील बाबा भिडे पूल पाण्याखाली गेला. 

Related Articles