१९७१ च्या युद्धाचा बदला घेणार   

असीम मुनीरचे विषारी फुत्कार

वॉशिंग्टन: भारताचे तुकडे करुन १९७१ मधील युद्धाचा बदला घेणार असल्याची मुक्ताफळे पाकिस्तानचे लष्करप्रमुख, फील्ड मार्शल असीम मुनीर यांनी अमेरिकेत उधळली आहेत. 
अमेरिकेतील पाकिस्तानी समुदायासमोर त्यांनी नुकतेच भाषण केले. त्यावेळी त्यांनी भारताविरुद्ध गरळ ओकली. मे महिन्यात भारताविरोधातील संघर्षात पाकिस्तानने सपाटून मार खाल्ला होता. त्यानंतर त्यांची मस्ती जिरलेली नाही. संघर्षात पाकिस्तान जिंकला, असे सांगताना त्यांनी १९७१ च्या युद्धातील पाकिस्तानच्या पराभवाचा बदला घेतला जाईल, अशी धमकी दिली. दरम्यान, असीम मुनीर यांना पाकिस्तानात मुल्ला मुनीर म्हणूनही ओळखले जाते. यापूर्वी त्यांनी जम्मू आणि काश्मीरबाबत वादग्रस्त विधान केले होते. यानंतर पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी २२ एप्रिल रोजी पहलगाम पर्यटनस्थळावर हल्ला करुन निष्पाप पर्यटकांचे प्राण घेतले होते. त्यांचा धर्म विचारुन हत्या केली होती. यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानला धडा शिकविला होता. 
 
दरम्यान, पाकिस्तानी पत्रकार एजाज सय्यद यांनी एका टॉक शोमध्ये सांगितले की, असीम मुनीर म्हणाले होते की,  ते भारताचे तुकडे करुन १९७१ च्या युद्धातील पाकिस्तानच्या पराभवाचा बदला घेतील. त्यांच्या भाषणादरम्यान वॉशिंग्टनमध्ये उपस्थित पाकिस्तानी वंशाचे नागरिक नोमान मुगल यांच्या मते, मुनीर म्हणाले की, ’पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानने चीनसोबत भारताविरुद्ध लढा दिला आहे.’
 

Related Articles