सांगलीत काँग्रेसला धक्का जयश्री पाटील भाजपमध्ये   

मुंबई, (प्रतिनिधी) : सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा आणि स्व.मदन पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. 
 
सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने हा पक्षप्रवेश झाला. जयश्री पाटील या माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या नातसून आहेत. जयश्री पाटील यांच्या भाजप प्रवेशामुळे सांगली जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला असून जिल्ह्यात भाजपला मोठी ताकद मिळाली आहे. भाजपने विरोधी पक्षात असतानाही कधीही देशहित आणि समाजहिताचा विचार सोडला नाही. मात्र, विरोधी पक्षात असलेल्या काँग्रेसचे नेतृत्व हे दिशाहीन झाले असल्याची टिका फडणवीस यांनी यावेळी केली. सांगली जिल्ह्यात भाजपची ताकद जयश्री पाटील यांच्या प्रवेशामुळे वाढणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
 
या वेळी आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम आदी उपस्थित होते. यावेळी फडणवीस यांनी वसंतदादा पाटील यांच्या लोकहिताच्या अनेक निर्णयांचे स्मरण केले. वसंतदादांच्या समाजकार्याचा वारसा जयश्री पाटील पुढे चालवत आहेत. काँग्रेसने त्यांच्या कार्याची दखल घेतली नाही. मात्र, भाजप परिवारामध्ये त्यांची आणि कार्यकर्त्यांची आपुलकीने काळजी घेतली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. 

Related Articles