पाचगणीत पालिकेचा‘सोलर ट्री’ कोसळला   

सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

सातारा, (प्रतिनिधी) : पाचगणी नगरपालिकेने सिडनी पॉइंटवर सहा महिन्यांपूर्वी उभारलेला अत्याधुनिक सोलर ट्री सोसाट्याच्या वार्‍याने जमीनदोस्त झाला. सुदैवाने त्याठिकाणी पर्यटक नसल्याने जीवितहानी टळली. मात्र, लाखो रुपये खर्च करूनही ठेकेदाराने केलेल्या निकृष्ट कामाबद्दल नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
 
पाचगणी नगरपालिका सर्व पर्यटन पॉइंट्स सुशोभीकरणासाठी कोट्यवधी रुपये दरवर्षी खर्च करीत असते. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी खेळणी, पॅगोडा, झुलते पूल, गॅलरी अशा विविध कामे केली जात आहेत; परंतु ही कामे निकृष्ट दर्जाची होत असल्याचाप्रत्यय झालेल्या घटनेतून येत आहे. सहा महिन्यांपूर्वी सिडने पॉइंट व टेबल लँडवर एक असे दोन सोलर ट्री बसवले होते.
 
जोरदार वारे असणार्‍या पॉइंटवर बसवलेले हे सोलर ट्री त्याच प्रतिच्या कामांमधून करणे आवश्यक होते. मात्र, तसे न झाल्याने तो कोसळला असल्याचे बोलले जात आहे. सहा महिन्यांतच झालेल्या या घटनेने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. अशी कामे करणार्‍या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
 
प सिडनी पॉइंट हा उंचावर असून, याठिकाणी वार्‍याचे मोठे प्रमाण असते. सध्या पाऊस अन् जोराचे वारे वाहत आहे. या वार्‍याने हे युनिट कोसळले आहे. तरीसुद्धा आम्ही संबंधित ठेकेदाराच्या कामाची चौकशी करणार आहोत.
 
- निखिल जाधव, मुख्याधिकारी
 
पाचगणी नगरपालिकेने सिडनी पॉइंट येथे लाखो रुपये खर्च करून डिझाईनमध्ये सोलर युनिट बसवले होते. त्या युनिटमध्ये थोडे आर्थिक वजन कमी पडल्यामुळे ते वार्‍याच्या झोक्याने जमिनीवर कोसळले. नगरपालिकेने कोट्यवधी रुपये खर्ची टाकायचे; पण ठेकेदाराने आपल्या जास्तीतजास्त आर्थिक कायद्यासाठी निकृष्ट दर्जाची कामे करायची. या ठेकेदारावर तातडीने कारवाई होणे गरजेचे आहे.
 
- दीपक कांबळे, सामाजिक कार्यकर्ते.
 

Related Articles