पंतप्रधान मोदी यांच्या कुटुंबातील व्यक्तींना दर्शनासाठी द्यावे लागले पैसे   

भीमाशंकर, (वार्ताहर) : श्री क्षेत्र भीमाशंकर येथे एसटी बसस्थानकासमोर पोलिसांचे बॅरेकेट लावून बसलेल्या खासगी एजंटांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुटुंबातील व्यक्तिंकडून एक हजार रूपये घेवून मंदिराकडे सोडले. अन् मंदिराकडे घेवून जाणार्‍या मोटार सायकल व्यक्तिंने त्यांच्याकडे दर्शनासाठी पाचशे रूपयांची मागणी केली असल्याचे सोनल मोदी यांनी सांगत नाराजी व्यक्त केली.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुतणी, भावजय, सोनल प्रल्हाद मोदी, ज्योतिबेन मोदी, विराग मोदी, नतनाबेन मोदी यांनी कोणतीही शासकीय सुविधा न घेता मंगळवारी सायंकाळी श्री क्षेत्र भीमाशंकर येथे दर्शनासाठी गेले असता त्यांना एसटी बसस्थानकासमोर पोलिसांचे बॅरेकेट लावून बसलेल्या खासगी एजंटांनी मंदिराकडे जाण्यासाठी दोन हजार रूपयांची मागणी केली. त्यावेळी त्यांनी पोलीस कर्मचार्‍यांबाबत त्या एजंटांकडे चौकशी केली तर त्यांना घोडेगाव या ठिकाणी ५० किलोमीटर अंतरावर आहे. तेथे जा असं उत्तर दिले. 
 
सोनल मोदी यांच्याबरोबर त्यांची भावजय वयोवृध्द असल्याने अन् चालताना त्यांना थकवा येत असल्याने त्यांनी एजंटाबरोबर झालेली तटजोड स्वीकारत एक हजार रुपये दिले. त्यानंतर एजंटांनी बॅरेकेट बाजुला केले. त्यानंतर त्यांना मंदिर रस्ता दाखवण्यासाठी मोटार सायकल व्यक्तिस पाठविले. त्यानेही मंदिराजवळ गेल्यानंतर दर्शनासाठी पाचशे रूपयांची मागणी केली. मात्र त्यास पैसे दिले नाही. अन् मंदिरामध्ये जाण्यासाठी अगोदरच मंदिरातील गुरूजींना माहिती दिली असल्याने मंदिरात कुणी पैसे मागितले नसल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुतणी सोनल मोदी यांनी सांगितले.   
 
श्री क्षेत्र भीमाशंकरहून घोडेगाव येथे बुधवारी सकाळी श्री क्षेत्र हरिश्चंद्र मंदिर येथील पवित्र शिवलिंगाचे दर्शन व जलाभिषेक करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुटुंबातील व्यक्ति आले असता. त्यांनी श्री क्षेत्र भीमाशंकर येथे आर्थिक लुटमार होत असलेल्या घटनेबाबत माहिती देत नाराजी व्यक्त केली. अन् हरिश्चंद्र मंदिरातील शिवलिंगाचे दर्शन घेवून समाधान व्यक्त केले. यावेळी हरिश्चंद्र मंदिर संस्थान अध्यक्ष प्रशांत काळे, राजेश काळे, अ‍ॅड. संजय आर्विकर, गजानन काळे उपस्थित होते.
 
सोमवारी पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधिक्षक संदिप गिल क्षेत्र भीमाशंकर येथे आले असता पोलीस प्रशासनाने सर्व व्यवस्थित असल्याचे भासविले. परंतु ते गेल्यानंतर लगेच पुन्हा श्री क्षेत्र भीमाशंकर येथे भाविकांची आर्थिक लुटमार चालू झाली.
 

Related Articles