आषाढी वारी आणि एकादशीमुळे उपवासाच्या पदार्थांना मागणी   

साबुदाण्याच्या दरात घट; शेंगदाणा, भगरीच्या दरात वाढ

पुणे : वारी आणि उपवास हे समीकरणच आहे. त्यामुळे उपवासासाठी लागणारे साबुदाणा, भगर आणि शेंगदाणाला ग्राहकांकडून मागणी वाढली आहे. उत्पादन वाढल्यामुळे साबुदाणाच्या दरात घट झाली आहे, तर शेंगदाणा आणि भगरीच्या दरात वाढ झाली आहे. अशी माहिती व्यापारी आशिष दुगड, अशोक लोढा यांनी दिली.यंदा साबुदाणाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे घाऊक बाजारात किलोच्या दरात ७ ते ८ रूपयांनी घट झाली आहे. भगरीला मागणी वाढल्याने किलोमागे आठ ते दहा रुपयांनी वाढ झाली आहे. जागतिक बाजारात शेंगदाणा तेलाचे दर वाढल्याने घाऊक बाजारात शेंगदाणाच्या क्विटलच्या दरात २०० रूपयांनी वाढ झाली आहे. 
 
मार्केटयार्डातील भुसार विभागात रोज ८० ते ९० टन साबुदाणाची आवक होत आहे. ही आवक तामिळनाडूतील शेलम या भागातून होत आहे. मागील वर्षी पाऊस चांगला झाला होता. साबुदाणासाठी वातावरण पोषक होते. त्यामुळे उत्पादनात लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे उत्पादनात या महिन्यात पालखी सोहळा, आषाढी एकादशी, त्यानंतर श्रावण, गणेशोत्सव, नवरात्र सण येणार आहेत. या सणांच्या काळात उपवासासाठी म्हणून साबुदाणाला ग्राहकांकडून मागणी वाढत असते. सद्य:स्थितीत मागणीच्या तुलनेत साबुदाणाची आवक होत आहे. मात्र सणाच्या काळात दरात काही प्रमाणात वाढ होणार असल्याचा अंदाजही आशिष दुगड यांनी व्यक्त केला आहे.
 
मागील वर्षी दर आणि आताचे दर जवळपास सारखेच आहेत. सणाला सुरूवात झाल्यानंतर मात्र साबुदाणाच्या मागणीत वाढ होईल. सद्य:स्थितीत हॉटेल चालक, साबुदाणा वडे विक्रेते तसेच घरगुती ग्राहक आदीकडून मागणी आहे. साबुदाणाच्या तुलनेत मात्र भगरचा मिलेट प्रकारात समावेश करण्यात आला असल्यामुळे भगरचे सातत्याने वाढ होत आहे. उत्सव आणि सण काळात भगरीचे दरही वाढणार असल्याचा अंदाजही आशिष दुगड यांनी व्यक्त केला.
 
मागणी वाढत जाणार 
 
साबुदाणा आणि भगरीच्या मागणीत वाढ झाली आहे. येत्या काळात सण आणि उत्सव आहेत. त्यामुळे मागणीत वाढ होणार असून वाढलेली मागणक्ष कायम असणार आहे. भगरला मिलेट प्रकारात समाविष्ट करण्यात आल्यामुळे मागील काही काळापासून त्याची मागणी सातत्याने वाढत आहे. भगरीच्या किलोच्या दरात १० रूपयांनी वाढ झाली आहे. 
 
- आशिष दुगड, व्यापारी, मार्केट यार्ड.
 
क्विंटलच्या दरात २०० रूपयांनी वाढ 
 
जागतिक बाजारपेठेत तेलाचे दर वाढले आहेत. त्यामुळे घाऊक बाजारात शेंगदाणाचे क्विंटलचे दर २०० रूपयांनी वाढले आहेत. वारी आणि उपवासामुळे  शेंगदाण्याच्या मागणीत वाढ झाली आहे. सद्य:स्थितीत बाजारात आवक चांगली आहे. घाऊक बाजारात घुंगरू शेंगदाणा ९२ ते ९८ रूपये, स्पॅनिश १०० ते ११५, तर जाडा शेंगदाणा ९० ते १०० रूपये किलो आहे. शेंगदाणाला मागणी टिकून राहणार असल्याचा अंदाज आहे. 
 
- अशोक लोढा, शेंगदाणा व्यापारी मार्केट यार्ड.
 
घाऊक बाजारातील दर
 
वर्ष           दर
२०२४ ६१०० ते ६३००
२०२५ ५१०० ते ५३००

Related Articles