कृषी क्षेत्रात होणार ‘एआय’चा वापर   

महाअ‍ॅग्री-एआय धोरणाला मंत्रिमंडळाची मंजुरी

मुंबई, (प्रतिनिधी) : महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रात आता आमुलाग्र बदल होणार आहेत. राज्याच्या कृषी  क्षेत्रात आता कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (एआय) वापर होणार आहे. त्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने महाअ‍ॅग्री-एआय धोरण २०२५-२०२९ मंजूर केले आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), निर्मितीक्षम कृत्रिम बुद्धिमत्ता (जेनरेटिव्ह एआय), इंटरनेट ऑफ थिंग्ज , ड्रोन, संगणकीय दृष्टिक्षमता, रोबोटिक्स आणि पूर्वानुमान विश्लेषण  यांसारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या मदतीने शाश्वत व विस्तारयोग्य उपाययोजना राबविता येणार आहेत.
 
राज्यातील ग्रीस्टॅक, महा-ग्रीस्टेक, महावेध, क्रॉपसॅप, गमार्कनेट, डिजिटल शेतीशाळा, महा-डिबीटी यांसारखे प्रकल्प पुढे नेण्यास मदत होणार आहे.  या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी पहिल्या तीन वर्षांसाठी ५०० कोटींचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.
 
कृत्रिम बुद्धिमत्ता  क्षेत्र वेगाने बदलणारे आहे. त्यामुळे पुढील पाच वर्षांत या धोरणामध्ये आवश्यक ते बदल,  सुधारणा करण्यात येतील.  त्यासाठी राज्यस्तरीय सुकाणू समिती,  राज्यस्तरीय तांत्रिक समिती, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि अ‍ॅग्रीटेक नाविन्यता केंद्र, कृषि विद्यापीठांतर्गत कृषि कृत्रिम बुध्दिमत्ता संशोधन व नाविन्यता केंद्र काम करतील. या धोरणाच्या माध्यमातून राज्यात कृषि क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता आणि  नाविन्यतेसाठी एक अग्रगण्य केंद्र निर्माण होईल. या धोरणामुळे कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा शेतकरी-केंद्रित वापर, संशोधन, डेटा देवाण-घेवाण वाढेल,  स्टार्ट-अप्सना पाठबळ मिळेल आणि यातून महाराष्ट्र डिजिटल कृषि नाविन्यतेमध्ये आघाडीवर राहील, अशी अपेक्षा आहे.
 

Related Articles