बटलरचे ४ धावांनी शतक हुकले   

चेस्टर-ल-स्ट्रीट : मॉडर्न क्रिकेटमधील स्फोटक फलंदाजांपैकी एक असलेला जोस बटलर आयपीएलमधील दमदार फॉर्म घेऊनच आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मैदानात उतरल्याचे दिसते. वेस्ट इंडिज विरुद्धच्या टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात त्याने तुफान फटकेबाजीसह त्याने कॅरेबियन गोलंदाजांची धुलाई केली. इंग्लंडमधील चेस्टर-ल-स्ट्रीटच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात जोस बटलरने वादळी खेळीसह ५९ चेंडूत ९६ धावांची खेळी केली. आंतरराष्ट्रीय टी-२० कारकिर्दीतील दुसर्‍या शतकाच्या उंबरठ्यावर असताना तो नर्व्हस नाइंटीजचा शिकार ठरला. १०१ ही त्याची टी-२० कारकिर्दीतील सर्वोच्च धावसंख्या आहे.
 
त्याचे शतक अवघ्या ४ धावांनी हुकले. त्याच्या या खेळीच्या जोरावर घरच्या मैदानातील वेस्ट इंडिज विरुद्धच्या टी-२० मालिकेत  इंग्लंडच्या संघाने १-० अशी आघाडी घेतली. पण जबरदस्त खेळीनंतरही बटलरच्या नावे नकोसा विक्रम नोंदवला गेला. वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यात शतक हुकले अन् जोस बटलर हा आंतरारष्ट्रीय टी-२० सामन्यात नव्वदीच्या घरात बाद होणारा इंग्लंडचा पहिला विकेट किपर बॅटर ठरला. याशिवाय नर्व्हस नाइंटीजचा शिकार होणारा इंग्लंडचा तौ चौथा फलंदाज आहे. याआधी अ‍ॅलेक्स हेल्स, इऑन मॉर्गन आणि जॉनी बेअरस्टो यांच्या पदरी ही नामुष्की ओढावली आहे.
 
वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना जेमी स्मिथच्या साथीनं डकेटनं इंग्लंडच्या डावाची सुरुवात केली. डकेट अवघ्या एका धावेवर तंबूत परतल्यावर जोस बटलर बॅटिंगला आला. सलामीवीर जेमी स्मिथच्या साथीनं दुसर्‍या विकेटसाठी त्याने ७९ धावांची भागीदारी रचली.  तो परतल्यावर बटलरनं आपली फटकेबाजी सुरुच ठेवली. तो अगदी सहज शतकाला गवसणी घालेले, असे वाटत होते. पण १९ व्या षटकातील चौथ्या चेंडूवर अल्झारी जोसेफ याने त्याला पायित केले. बटलरने ५९ चेंडूत ६ चौकार आणि ४ षटकाराच्या मदतीने केलेल्या ९६ धावांच्या खेळीच्या जोरावर इंग्लंडनं निर्धारित २० षटकात ६ बाद १८८ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिज संघ १६७ धावांवर आटोपला.

Related Articles