शिवसृष्टीच्या तिसर्‍या टप्प्याचे आज भूमीपूजन   

पुणे : महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने आंबेगाव बुद्रुक येथे साकारत असलेल्या शिवसृष्टीच्या तिसर्‍या टप्प्याचे भूमिपूजन येत्या आज सकाळी १०.३० वाजता होणार आहे. केंद्रीय सांस्कृतिक व पर्यटन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्या हस्ते हा भूमिपूजन सोहळा शिवसृष्टी येथे होईल, अशी माहिती प्रतिष्ठानचे विश्वस्त जगदीश कदम यांनी दिली.
 
जगदीश कदम म्हणाले, १९६७ पासून कार्यरत असलेल्या महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या माध्यमातून शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून शिवसृष्टीची उभारणी आंबेगाव बुद्रुक येथे २१ एकर परिसरात सुरु आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून प्रतिष्ठानतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारीत आशियातील एकमेव असा हा ऐतिहासिक प्रकल्प साकारत आहे. 
 
शिवचरित्रासोबतच छत्रपती शिवरायांची शिकवण, स्वधर्म, स्वराज्य, स्वभाषा यांचा प्रसार, प्रचार व्हावा या उद्देशाने हे कार्य सुरु आहे. या प्रकल्पासाठी ४३८.६८ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. प्रकल्पाच्या पहिल्या व दुसर्‍या टप्प्याचे लोकार्पण होऊन आजवर ५ लाख पर्यटक, शिवप्रेमी, इतिहासप्रेमी, शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी यांनी या प्रकल्पाला भेट दिली आहे. आता भूमिपूजनानंतर नजीकच्या भविष्यात तिसर्‍या टप्प्याच्या कामाला गती येईल.

Related Articles