गुंड गजा मारणेच्या साथीदाराच्या पोलिस कोठडीत वाढ   

पुणे : गुंड गजा मारणेला येरवडा कारागृहातून सांगली कारागृहात नेत असताना एका ढाब्यावर झालेल्या पार्टीत सामील झालेल्या त्याच्या साथीदाराच्या पोलिस कोठडीत पाच जूनपर्यंत वाढ करण्याचे आदेश विशेष न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांनी दिले.
 
विशाल विलास धुमाळ (वय-३८, रा. राजेंद्र नगर) असे कोठडीत वाढ करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. कोथरूड भागात संगणक अभियंता तरुणाला मारहाण प्रकरणात गजानन उर्फ गजा मारणे याच्यासह साथीदार रूपेश मारणे, ओम तीर्थराम धर्मजिज्ञासू, किरण कोंडिबा पडवळ, अमोल विनायक तापकीर (सर्व रा. शास्त्रीनगर, कोथरूड), तसेच मारणेचा भाचा बाब्या उर्फ श्रीकांत संभाजी पवार (रा. वडगाव रासाई, शिरूर) यांच्याविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई करण्यात आली. 
 
मारणेला येरवडा कारागृहातून सांगलीतील कारागृहात हलविण्यात येत असताना त्याला बिर्याणी देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षकासह चार पोलिस कर्मचार्‍यांना निलंबित करण्याचे आदेश दिले. मारणेला ढाब्यावर भेटण्यासाठी आलेले साथीदार पांड्या मोहिते, आर्थिक मदत करणारा विशाल धुमाळ यांना अटक करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध ‘मकोका’ कारवाई करण्यात आली. 
 
धुमाळ याच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येत असून, आरोपींची वाहने जप्त करायची आहे. तपासासाठी धुमाळ याच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची विनंती विशेष सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी युक्तिवादात केली.

Related Articles