‘बंगळुरु’ आयपीएलचा नवा मानकरी   

१८ वर्षांनी चषकावर कोरले नाव ; अवघ्या सहा धावांनी विजय

अहमदाबाद : शेवटच्या क्षणांपर्यंत रंगलेल्या थरारक सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने आयपीएलचे विजेतेपद पटकावले. १८ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर बंगळुरूचे नाव आयपीएलच्या विजेत्यांच्या चषकावर कोरले गेले. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली अनेक अपयश पाहिलेल्या या संघाने रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदाच चषक जिंकला. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्ज यंदा पहिल्यांदाच अंतिममध्ये पोहोचून विजेतेपदाच्या खूप जवळ आला होता. मात्र अंतिम क्षणी बंगळुरूने केलेल्या उत्कृष्ट खेळीने पंजाबचे स्वप्न भंगले.
 
सामनावीराचा किताब कृणाल पांड्याला २ महत्त्वपुर्ण बळी टिपल्यामुळे देण्यात आला.  विराट कोहलीसाठी हा क्षण अत्यंत भावनिक ठरला. आयपीएलमध्ये अनेक वैयक्तिक विक्रम गाठणार्‍या या दिग्गज खेळाडूचे संघाला चॅम्पियन बनवण्याचे स्वप्न अखेर पूर्ण झाले. कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणार्‍या बंगळुरुने याआधी अनेकदा प्लेऑफ आणि फायनल गाठल्या होत्या, पण ट्रॉफी नेहमी हुलकावणी देत होती. यंदा मात्र रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली संघाने सर्व समतोल राखत अखेरच्या क्षणी बाजी मारली.
 
या सामन्यात पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. काइल जेमिसनने फिल साल्टला बाद करून पंजाबचा निर्णय योग्य असल्याचे सिद्ध केले, साल्ट १६ धावा करून बाद झाला, तर संघाकडून विराट कोहलीने ४३ धावा केल्या, मयंक अग्रवालने १७ चेंडूत २४ धावा केल्या, ज्यात २ चौकार आणि एक षटकार होता.
 
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने शेवटच्या १९ धावा करताना ४ बळी गमावल्या, तर शेवटच्या ५ षटकात ५८ धावा करताना ५ विकेट गमावल्या. एकेकाळी आरसीबीचा स्कोअर ५ बळीवर १७१ धावा होता, तर डाव संपला तेव्हा ९ विकेटवर १९० धावा होत्या. दरम्यान, जितेश शर्मा (२४), रोमारियो शेफर्ड (१७), कृणाल पंड्या (४) आणि भुवनेश्वर कुमार (१) बाद झाले.
 
पंजाब किंग्जकडून काइल जेमिसन आणि अर्शदीप सिंगने ३-३ विकेट घेतल्या. अर्शदीप सिंग देखील महागडा ठरला. त्याने ४ षटकात ४० धावा दिल्या, तर अझमतुल्लाहने ४ षटकात ३५ धावा दिल्या आणि विराट कोहलीच्या रूपात मोठी बळी घेतला. विजय कुमारने ४  षटकांत ३० धावा देत एकबळी घेतला. आणि युजवेंद्र चहलने ४ षटकांत ३७ धावा देत १ फलंदाज बाद केला. 

संक्षिप्त धावफलक 

बंगळुरु : फिल सॉल्ट १६, कोहली ४३, मयांक अगरवाल २४, रजत पाटीदार २६, लिविंगस्टन २५, जितेश शर्मा २४, रोमारिओ शेफर्ड १७, कृणाल पांड्या ४, भुवनेश्वरकुमार १, यश दयाल १ अवांतर ९ एकूण २० षटकांत १९०/९
 
पंजाब : प्रियांश आर्या २४, प्रभासिमरन सिंग २६, जोश इंग्लिश ३९, श्रेयस अय्यर १, शशांक सिंग ६१, नेहल वाढेरा १५, स्टॉयनिस ६, अझमतुल्ला ओमारझी १, कायल जेमीसन ० अवांतर ११ एकूण : २० षटकांत १८४/७

Related Articles