नीलेश चव्हाण याचा कोठडीतील मुक्काम वाढला   

हगवणे पिता-पुत्राला न्यायालयीन कोठडी

पुणे : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात आरोपी नीलेश चव्हाण याला मंगळवारी न्यायालयाने ७ जूनपर्यंत पोलिस कोठडी, तर राजेंद्र व सुशील हगवणे या पिता-पुत्राला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.दहा  दिवसांपासून फरारी असलेल्या नीलेश याला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ३० मे रोजी नेपाळ सीमेवरून अटक केली होती. त्यानंतर त्याला न्यायालयाने ३ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. तर हगवणे या पिता-पुत्राला पोलिस कोठडीचा आदेश दिला होता. तिघांच्या कोठडीची मुदत संपल्याने बावधन पोलिसांनी काल त्यांना न्यायालयात हजर केले.
 
सरकारी वकिलांनी नीलेशकडून जप्त केलेल्या मोबाइलचा तपशील सादर केला. मोबाइलमध्ये हगवणे कुटुंबीयांमध्ये चॅटिंग आणि आर्थिक व्यवहार झाले असल्याचे पुरावे मिळाले आहेत. तसेच, नीलेशकडे वैष्णवीचे बाळ होते का? त्याने बाळाची हेळसांड केली का? याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी पाच दिवसांची पोलिस कोठडी मागितली. त्यावर, न्यायालयाने नीलेशला ७ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. दुसरीकडे, हगवणे यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली.  
 
नीलेशच्या वकिलांनी न्यायालयात युक्तीवाद केला की, नीलेशची सर्व चौकशी पूर्ण झाली असून, कोणताही मुद्दा शिल्लक राहिलेला नाही. त्यामुळे त्याला न्यायालयीन कोठडी द्यावी. मात्र, न्यायालयाने सरकारी वकिलांचा युक्तीवाद ग्राह्य धरत नीलेशला पोलिस कोठडी सुनावली. 
 
तपासाला गती
 
वैष्णवी मृत्यू प्रकरणात पोलिसांनी तपासाला गती दिली असून नीलेश चव्हाण याच्याकडून मिळालेल्या मोबाइलमधील चॅट्स आणि आर्थिक व्यवहारांचा तपशील तपासला जात आहे. याशिवाय, जेसीबी प्रकरणात शशांक आणि लता हगवणे यांच्यावरील आरोपांची चौकशीही जोरात सुरू आहे.

Related Articles