बलुच आर्मीच्या हल्ल्यात आयएसआय एजंट ठार   

क्वेट्टा : बलुच आर्मीच्या स्पेशल टॅक्टिकल ऑपरेशन्स स्क्वॉडने क्वेट्टामध्ये मोठी लष्करी कारवाई केली. या कारवाईदरम्यान पाकिस्तानी लष्कराचा प्रमुख एजंट बाबुल मुहम्मद हसनी याचा खात्मा करण्यात आल्याचे बीएलएने म्हटले आहे. बीएलएचा गुप्तचर विभाग झिराबने यासंदर्भात माहिती दिली.क्वेट्टामधील बरुरी रस्त्यावरील एका थांब्यावर हसनीच्या वाहनाला चुंबकीय  बॉम्ब चिकटवण्यात आला. हसनी गाडीत बसताच काही अंतरावर गेल्यावर स्फोट घडविण्यात आला. यात हसनीचा जागीच मृत्यू झाला तर त्याचा सहकारी गंभीर जखमी झाला आहे. या स्फोटात त्याच्या वाहनाचा चेंदामेंदा झाला आहे. 
 
हसनी हा पाकिस्तानी सैन्य आणि त्यांच्या गुप्तचर संस्थांचा एक प्रमुख एजंट होता. जिहादी स्क्वॉड एजंट जकारिया मुहम्मद हसनीचा तो भाऊ होता. जिहादी स्क्वॉडशी त्याचे थेट संबंध होते. त्याने कटाल भागात एक सशस्त्र टोळी उभी केली होती. ती शहर आणि गावांत दहशत माजवत होती. बलुच तरुणांना गायब करायचे आणि त्यांचा छळ करायचा उद्योगही या टोळीने चालवला होता. या टोळीने अनेक भागात चौक्या उभारल्या होत्या. याद्वारे बलुच लोकांवर दहशत निर्माण केली जात होती.  
 
दरम्यान, सध्या पाकिस्तानमध्ये बलुच लिबरेशन आर्मी पाकिस्तान लष्कराविरोधात सतत कारवाई करत आहे. बीएलएने पाकिस्तानच्या बलुचिस्तानमधील सुरब शहरावर देखील नियंत्रण मिळवले असल्याचे म्हटले आहे. दिवसेंदिवस पाकिस्तानी लष्कराविरोधात बीएलएच्या कारवायांमध्ये वाढ होत आहे. बलुच आर्मीने बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची मागणी केली आहे. गेल्या काही काळापासून पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये अनेक दहशतवादी हल्ले झाले आहेत. यामुळे बलुचिस्तानमधील नागरिकांनी पाकिस्तान सरकार आणि पाकिस्तान लष्कराविरोधात बंड पुकारला आहे. 
 

Related Articles