पोलिसांनी तपासले १९ साक्षीदार   

वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरण 

पिंपरी : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात बावधन पोलिसांनी आतापर्यंत १९ साक्षीदारांची चौकशी केली आहे. यातून अनेक गंभीर बाबींचा उलगडा केला जात असून तपासाला वेग देण्यात आला आहे. पोलिसांकडून आरोपींविरोधात भक्कम आणि खात्रीशीर पुरावे गोळा केले जात आहेत.  
 
वैष्णवी हिने १६ मे रोजी आत्महत्या केल्यानंतर १७ मे रोजी तिच्या वडिलांनी बावधन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर, पती शशांक हगवणे, सासू लता आणि नणंद करिष्मा या तिघांना अटक करण्यात आली. दरम्यान, सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील फरारी झाले होते. पोलिसांनी शोधमोहीम राबवून त्यांनाही अटक केली. दरम्यान, वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिच्या दहा महिन्यांच्या बाळाचा ताबा न देणारा सहआरोपी नीलेश चव्हाण नेपाळपर्यंत पळून गेला होता. मात्र, त्यालाही पोलिसांनी उत्तर प्रदेशातील महाराजगंज येथून अटक केली आहे.
 
या प्रकरणात आता वैष्णवीच्या इतर मैत्रीणींसह आणखी काही साक्षीदारांची चौकशी लवकरच होणार आहे. हे प्रकरण अतिशय संवेदनशील बनले असून पोलिसांकडून तांत्रिक आणि कायदेशीर बाजू बळकट करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. साक्षी, पुरावे आणि आरोपींच्या जबाबांवरून लवकरच अंतिम निष्कर्षापर्यंत पोहोचण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. सध्या शशांक, लता, करिष्मा, राजेंद्र व सुशील हगवणे हे न्यायालयीन कोठडीत, तर नीलेश पोलिस कोठडीत आहे. नीलेशकडून बाळासंदर्भातील माहिती व मृत्युपूर्वी घडलेल्या वादावादीच्या पार्श्वभूमीची चौकशी सुरू आहे. वैष्णवीच्या आत्महत्येच्या काही तासांपूर्वी घडलेल्या वादांची, फोन कॉल्सची आणि मेसेजेसची जुळवाजुळव करण्यात येत आहे.संपूर्ण तपासात पिंपरी-चिंचवड पोलिसांची सहा आणि पुणे पोलिसांची तीन पथके सक्रिय आहेत. पोलिसांनी गुन्हे शाखा युनिट ४, सायबर सेल, फॉरेन्सिक आणि तांत्रिक शाखांची तपासात मदत घेतली आहे.

Related Articles