व्हॉट्सऍप कट्टा   

बाई

बाई जराशी धीट हो
जन्म तुझाही मोलाचा
सांग ठासून जगाला 
तुझ्या ना कोणी तोलाचा
 
चार बुक शिकून तू 
अडाणीच वावरते
मारहाण रोज तरी 
सासरला सावरते 
 
कशापायी बडेजाव 
खोटानाटा सरंजाम
कर एकदा मोकळे 
दुःख तुझे खुलेआम 
 
लोकं काय म्हणतील
हाच विचार शिगेला
स्वतःसाठी जग थोडी 
आत्मा कायम भुकेला  
 
कधी तुला देव्हार्‍यात 
देवी म्हणुन पुजले 
कधी ऍसिड फेकून 
भर रस्त्यात भाजले
 
साधी भोळी सहिष्णु का
विशेषण मिरवते 
शक्ती तुझी अफाट जी 
राक्षसांना हरवते
 
कळली नाही कोणा तू
पुन्हा घे त्रिशूळ हाती
दुष्ट पापी दुष्कर्मिंना
तुझीच वाटावी भीती
 
प्राची गडकरी, डोंबिवली
मो. ९९८७५६८७५०

Related Articles