बलुचिस्तानमध्ये शाळेच्या बसवर आत्मघातकी हल्ला   

तीन मुलांसह पाच ठार; ३८ जखमी

इस्लामाबाद/कराची : पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात बुधवारी एका शाळेच्या बसवर आत्मघाती हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात तीन मुलांसह पाच जण ठार झाले. तर, अनेक जण जखमी झाले आहेत, असे लष्करी अधिकार्‍यांनी सांगितले.खुजदार जिल्ह्यात शालेय मुलांना घेऊन जाणार्‍या बसला लक्ष्य करण्यात आले. या भ्याड आणि भयानक हल्ल्यात तीन मुलांसह पाच जण ठार झाले. तर, अनेक मुले जखमी झाले आहेत, असे लष्कराने निवदेनात म्हटले आहे. गृहमंत्रालयानेदेखील आत्मघातकी स्फोटास दुजोरा दिला आहे. 
 
या स्फोटात ३८ जण जखमी झाले आहेत, असे खुजदारचे उपायुक्त यासिर इक्बाल दश्ती यांनी सांगितले. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकार्‍यांसह पोलिस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच, घटनास्थळावरुन पुरावे गोळा केले जात आहेत, असे अधिकार्‍यांनी सांगितले.
 
प्राथमिक निष्कर्षांवरून हा हल्ला आत्मघातकी स्फोट असल्याचे दिसून आले आहे. जखमींना प्रारंभी लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर, पुढील उपचारासाठी क्वेटा आणि कराची येथील रुग्णालयात हलवण्यात आले.       
 
पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी हल्ल्याचा निषेध केला आहे. तसेच, निष्पाप मुलांच्या आणि शिक्षकांच्या हत्येबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. हे कृत्य करणार्‍यांना लवकरच पकडले जाईल तसेच त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी म्हटले आहे. निष्पाप मुलांना लक्ष्य करणार्‍यांवर कोणतीही दयामाया दाखवली जाणार नाही, असेही ते म्हणाले. या हल्ल्याची अद्याप कोणत्याही गटाने जबाबदारी स्वीकारलेली नाही. इराण आणि अफगाणिस्तानच्या सीमेला लागून असलेला बलुचिस्तान हा प्रांत नेहमीच अशांत राहिला. बलुच बंडखोरांनी यापूर्वी चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर प्रकल्पांना लक्ष्य केले होते.
 

Related Articles