मसाले व्यापार्‍यांचाही तुर्की वस्तूवर बहिष्कार   

पुणे : भारत पाकिस्तान यांच्यातील तणावात तुर्कीने पाकिस्तानला पाठिंबा दिला आहे. तुर्कीच्या भूमिकेचा निषेध करत पुण्यातील मसाले आणि सुकामेवा असोसिएशनने तुर्की येथून आयात होणार्‍या ड्रायफ्रुट आणि मसाल्यांवर  बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी तुर्कीतून येणार्‍या सफरचंदावर व्यापार्‍यांनी बहिष्कार टाकला. मार्केट यार्डातील मसाले आणि ड्रायफ्रुट व्यापार्‍यांनी बॅन तुर्की असा ट्रेंड सुरू केला आहे. 
 
भारतात तुर्कीवरून बदाम, अंजीर, अक्रोड, हॅझलनट्स, जर्दाळू, पिस्ता यासह काही मसाले आयात होतात. देशविरोधी भूमिका घेणार्‍या कोणत्याही देशाशी व्यापार न करण्याचा निर्णय असोसिएशनने एकजूटिने घेतला आहे. भारतीय व्यापार्‍यांनीही तुर्कीच्या उत्पादनांऐवजी पर्यायी देशांचा विचार करावा, असे आवाहन देखील असोसिएशने केले आहे. तुर्कीने भारताच्या विरोधात भूमिका घेऊन पाकिस्तानला साथ दिली आहे, हे राष्ट्रीय हिताला बाधा आणणारे आहे. त्यामुळे आमच्या असोसिएशनने तुर्कीमधून आयात होणार्‍या वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचा ठराव संमत केला असल्याचे समितीचे सदस्य नवीन गोयल यांनी सांगितले.
 
व्यापारी विनोद गोयल म्हणाले, दरवर्षी तुर्कीमधून मोठ्या प्रमाणात ड्रायफ्रूट्स आणि काही मसाले भारतात आयात केले जातात. पुणे शहर प्रमुख ड्रायफ्रूट वितरण केंद्रांपैकी एक आहे. त्यामुळे येथील मार्केट यार्डात मोठ्या प्रमाणात तुर्कीवरून माल येतो. आम्ही देशहितासाठी तुर्कीच्या कोणत्याही वस्तू आयात करणार नाहीत. तसेच त्या विकणार देखील नाही. पुण्यातील सर्व व्यापारी एकत्रित हा निर्णय घेतला आहे.
 
तुर्की वस्तूंची खरेदी नाही 
 
पुण्यातील मसाले आणि ड्रायफ्रूट असोसिएशनने तुर्कीवरून येणार्‍या सर्व प्रकारच्या वस्तूंवर बहिष्कार टाकला आहे. भारताच्या विरोधात भूमिका घेणे हे राष्ट्रहिताला बाधा आणणारे आहे. ग्राहकांनी पण तुर्की वरून आलेल्या वस्तू खरेदी करू नये.
 
- अजित बोरा, अध्यक्ष, मसाले आणि ड्रायफ्रूट असोसिएशन.

Related Articles