कोट्यवधी खर्चून उभारलेली ई-लर्निंग यंत्रणा बंद   

पुणे : महापालिकेने शाळांमध्ये सुरु करण्यात केलेली कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेली ई-लर्निंग यंत्रणा बंद स्थितीत आहे. योजना ठराविक कालावधीसाठी करण्यात आली होती. सध्या इंटरनेट उपलब्ध नसल्यामुळे ही योजना बंद पडली आहे. त्यामुळे पालिकेचे या योजनेकडे लक्ष नसल्याचे उघड झाले आहे. 
 
महापालिकेने २०१७ साली ई-लर्निंग यंत्रणा २६५ शाळांमध्ये तसेच १४७ शाळांमध्ये २० कोटी ९९ लाख रुपये खर्च करुन उभारली होती. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे सत्र, तसेच विविध विषयांवरील माहीती देण्यासाठी पालिकेने लाखो रुपये करुन आकाशवाणीच्या धर्तीवर स्टुडिओ  देखिल उभारला आहे. मात्र ही यंत्रणाच बंद पडल्याने स्टुडिओसह सर्व यंत्रणा धूळखात पडून आहे. इंटरनेटची सुविधाच नसल्याने ही यंत्रणा बंद पडल्याचे प्रशासनातील एका अधिकार्‍याने सांगितले आहे. रिलायन्सच्या जिओ कंपनीने देशभरातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि पालिकांच्या शाळांना मोफत इंरटनेट सेवा देण्याची घोषणा केली होती. पालिका प्रशासनाने या सेवेसाठी पाठपुरावा करुन शाळांमध्ये ई-लर्निंग शिक्षण देण्यासाठी इंटरनेट जोडून घेतले होते. शहरातील पालिकेच्या विविध माध्यमांच्या २६५ शाळांमध्ये ई- लर्निंग सुरु झाले होते. पालिकेच्या शाळांमध्ये गरीब कुटुंबातील सुमारे एक लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पालिकेच्या शिक्षण मंडळाच्या माध्यमातून मुलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी मागील काही वर्षांत चांगले प्रयत्न केले जातात, त्यातीलच ही योजना होती.
 
विद्या निकेतन, इंग्रजी माध्यमांच्या शाळा, क्रीडा निकेतन, संगीत विद्यालय यासोबतच आधुनिक तंत्रज्ञानाची जोड असलेल्या ई-लर्निंगसाठी प्रयत्न करण्यात आले होते. गेल्या सात ते आठ वर्षांपासून ई-लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण देण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले आहेत. त्यामध्ये प्रत्येक इयत्तेनुसार अभ्यासक्रमाची सॉफ्टवेअर तयार करण्यात आली. २६५ शाळांतील वर्गखोल्यांमध्ये टीव्ही संच, तसेच शाळांसाठी संगणक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सुरवातीला बीएसएनएल या शासकीय कंपनीकडून सेवा घेण्यात आली. कोरोनामध्ये शाळा बंद राहिल्याने ही सेवा काहीशी विस्कळीत झाली होती. मात्र त्यानतंर याकडे लक्ष देण्यात आलेले नाही. केवळ इंटरनेट सेवा बंद असल्याने ई-लर्निंग बंद असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात येत आहे.
 
दरम्यान, बीएसएनएल पालिकेला इंटरनेट सेवा देण्यास असमर्थ ठरली आहे. रिलायन्स कंपनीने देशभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांना मोफत इंटरनेट सेवा देण्याचे जाहीर केले आहे. या योजनेअंतर्गत रिलायन्स कंपनीच्या जिओ इंटरनेटसाठी पाठपुरावा केला जातो. मात्र त्यानंतर ही जिओचे इंटरनेट पालिकेला घेता आलेले नाही. पालिकेने शाळांमध्ये जिओच्या माध्यमातून इंटरनेट सेवा घेवून ही यंत्रणा सुरु ठेवणे आपेक्षित होते. मात्र केवळ प्रशासनाच्या उदासीनतेमुळे ही यंत्रणा धूळखात पडून आहे.
 
पालिकेतील विविध विभागांचा आढावा घेतला. पालिकेच्या शाळांमध्ये विविध उपक्रम राबविण्यात येतात. यंदा विद्यार्थ्यांसाठी विशेष उपक्रम राबविण्यात यावा चर्चा झाली. पालिकेने सुरु केलेली ई-लर्निंग यंत्रणेबाबत चर्चा झाली. ही यंत्रणा बंद असल्याची माहिती विभाग प्रमुखांनी दिली.परंतु ही यंत्रणा का बंद आहे, याचे कारण त्यांनी सांगितले नाही. 
 
- एम जे प्रदीप चंद्रन, अतिरिक्त आयुक्त, महापालिका.
 
ई-लर्निंग यंत्रणा - २०१७ साली सुरुवात केली
ई-लर्निंग यंत्रणा - ऑक्टोबर २०२२ मध्ये यंत्रणा बंद पडली
महापालिकेच्या एकूण २६५ शाळांमध्ये सुरु होती ही यंत्रणा
एकूण २० कोटी ९९ लाख रुपये खर्च केले
सुमारे एक लाख विद्यार्थ्यांना होत होता फायदा
बीएसएनएल ठरले इंटरनेट सुविधा देण्यास असमर्थ

Related Articles