अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर पुणेकरांची सोने खरेदी   

पुणे : अक्षय तृतीयाच्या शुभमुहूर्तावर पुणेकरांनी बुधवारी सोन्याची खरेदी केली. शहरासह उपनगरांतील सराफी पेढ्यांवर सकाळपासूनच खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी दिसून आली. जागतिक अस्थिरता, वाढती महागाई आणि अस्थिर शेअर बाजार अशा परिस्थितमुळे नागरिकांनी सोन्यातील गुंतवणुकीला प्राधान्य दिले.
 
सोन्याचे दर गगनाला भिडले असून, २४ कॅरेट सोन्याचा तोळ्याचा भाव ९६,२०० रुपयांच्या घरात पोहोचला आहे. तरीही नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर दागिन्यांची खरेदी केली. लग्नसराईमुळे वेढणी, मंगळसूत्र, अंगठ्या, चेन तसेच सोन्याची व चांदीची नाणी यांना विशेष मागणी होती. महिला वर्गाबरोबरच पुरुषांनीही सुवर्ण अलंकारांच्या खरेदीत उत्साहाने सहभाग घेतला.
 
गेल्या वर्षी याच मुहूर्तावर २४ कॅरेट शुद्ध सोन्याचा दर ७२,४०० रुपये होता. यंदा तो ९६,२०० रुपयांवर पोहोचला आहे. २२ कॅरेटचे दरही ८८,५०० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. दरवाढ असूनही खरेदीवर त्याचा परिणाम जाणवला नाही.अक्षयतृतीयेच्या शुभ मुहूर्तावर दरवर्षी सोन्याला मोठी मागणी असते. यंदाही ती कायम आहे. सोन्याचे भाव वाढले असले तरी नागरिक गुंतवणूक म्हणून सोन्याकडे वळत आहेत. मागील दोन दिवसांपासून दागिन्यांची नोंदणी आणि वेढणी खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी आहे, असे सराफ व्यावसायिकांनी सांगितले.
 
सोन्याच्या वाढत्या किमती लक्षात घेता, वजनाने हलके दागिने जसे की चेन, अंगठ्या, आणि कानातले यांनाही पसंती मिळत आहे. बहुतांश ग्राहक आठवडाभर आधी दागिन्यांची नोंदणी करून मुहूर्तावर खरेदी पूर्ण करतात. जागतिक अस्थिरता, शेअर बाजारातील चढ-उतार आणि वाढती महागाई यामुळे अनेकजण सोन्याकडे गुंतवणूक म्हणून पाहत आहेत. यामुळे सोन्याची मोठ्या प्रमाणात खरेदी होत असल्याचे सराफ व्यावसायिकांनी सांगितले.सराफा बाजारातील सोन्याचे भाव (जीएसटीसह):२४ कॅरेट (प्रति तोळा): ९८,४७० रुपये२२ कॅरेट (प्रति तोळा): ९२,६०० रुपये१८ कॅरेट (प्रति तोळा): ७६,८०० रुपयेचांदी (१ किलो): ९८,००० रुपये.

Related Articles