हनुमान गढीचे महंत प्रथमच राममंदिरात   

अयोध्या : जवळपास तीनशे वर्षानंतर अयोध्येतील हनुमान गढीचे मुख्य पुजारी महंत प्रेम दास यांनी बुधवारी अक्षय्य तृतीयेच्या दिवशी हनुमान गढीबाहेर पाऊल ठेवले. हनुमान गढीच्या ५२ बिघा परिसरातून मुख्य पुजार्‍याला बाहेर पडण्यास मनाई असणार्‍या शतकानुशतके जुन्या धार्मिक परंपरेला छेद देत दास यांनी भव्य शाही मिरवणूकीतून राम मंदिराला भेट दिली.
 
हजारो नागा साधू, भाविक, शिष्य आणि हत्ती, घोडे, उंट या मिरवणुकीत सहभागी झाले होते. राम मंदिरात पूजा करण्यासाठी जाण्यापूर्वी सरयू नदीच्या तीरावर महंत प्रेम दास आणि इतर साधुंनी विधीवत स्नान केले. 
 
हनुमान गढीचे ज्येष्ठ संत महंत संजय दास म्हणाले, ही परंपरा १७३७ पासून २८८ वर्षांपासून पाळली जात आहे. महंतांची भूमिका स्वतःला पूर्णपणे हनुमानाला समर्पित करण्याची आहे. आसनावर अभिषेक झाला की, ते मंदिराच्या आवारातच राहतात आणि तिथेच त्यांचा शेवट होतो. 
 
निर्वाणी आखाड्याचे प्रमुख महंत रामकुमार दास म्हणाले, राम मंदिराला भेट देण्याची संतांची तीव्र इच्छा असल्याने त्यांना ही आयुष्यात एकदाच परवानगी देण्यात आली. १९२५ मध्ये तयार झालेल्या हनुमान गढीच्या घटनेनुसार या परंपरा नागा साधूंनी मान्य केल्या.

Related Articles