लष्कराला पूर्ण मुभा   

नवी दिल्ली : पहलगाममधील नरसंहारानंतर पाकिस्तानविरोधात भारताने आक्रमक भूमिका घेतली आहे. आता भारतीय लष्कराला कारवाईसाठी पूर्ण मुभा देण्यात आली आहे. कधी, कुठे आणि कशी कारवाई करायची, हे आता लष्कराने ठरवावे, असे केंद्र सरकारने म्हटले आहे. पाकिस्तानवर अनेक निर्बंध लादल्यानंतर पुढील व्यूहरचना ठरवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी एक उच्चस्तरीय बैठक पार पडली.
 
या बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि तिन्ही दलांचे प्रमुख जनरल अनिल चौहान यांसह तिन्ही दलाचे प्रमुख उपस्थित होते.
 
या बैठकीत हल्ल्यानंतरची परिस्थिती, सुरक्षा दलांची कारवाई आणि भविष्यातील रणनीती यावर चर्चा झाली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी लष्कराला पूर्ण स्वातंत्र्य दिले. हल्ल्याचे लक्ष्य आणि वेळ लष्कराने ठरवावे, असेही मोदी यांनी म्हटले असल्याचे सूत्रांनी सांगितले.पहलगाम हल्ल्यातील दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देतानाच अमरनाथ यात्रा आणि इतर नागरी उपक्रमांच्या सुरक्षेत कोणतीही चूक होणार नाही, याची खात्री करण्यासही सांगितले आहे.

Related Articles