दहशतवादाविरोधात हेरगिरी करणे काय चुकीचे?   

सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

नवी दिल्ली : दहशतवाद्यांविरूद्ध स्पायवेअरचा वापर केला जात असेल तर, यात गैर काय? असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी केला. एखाद्या देशाकडे स्पायवेअर असेल आणि त्याचा सुरक्षेसाठी वापर केला जात असेल तर त्यात काहीही गैर नाही. फक्त ते स्पायवेअर कोणाविरोधात वापरले जाते हा एकच प्रश्न आहे, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
 
न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती एन. कोतीश्वर सिंग यांच्या खंडपीठासमोर याबाबतचा अर्ज सुनावणीसाठी होता. इस्त्रायली बनावटीचे स्पायवेअर पेगासेस हे पत्रकार, कार्यकर्ते आणि राजकारणी यांच्यावर पाळत ठेवण्यासाठी वापरले जात असल्याच्या आरोपानंतर २०२१ मध्ये याबाबत अनेक अर्ज न्यायालयात दाखल करण्यात आले. या अर्जावर काल सुनावणी पार पडली. आता पुढील सुनावणी ३० जुलै रोजी होणार आहे.
 
काही अर्जदारांची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील दिनेश द्विवेदी यांनी सरकारकडे हे स्पायवेअर आहे की नाही याबद्दल प्रश्न उपस्थित केला होता. त्यांच्या अशिलाचा फोन हॅक झाला नसला तरी सरकारकडे स्पायवेअर आहे का हा प्रश्न कायम आहे, असे द्विवेदी म्हणाले. मूळ प्रश्न हा आहे की त्यांच्याकडे हे स्पायवेअर आहे का? आणि त्यांनी ते खरेदी केले आणि वापरले आहे की नाही. कारण, जर त्यांच्याकडे ते असेल तर त्यांना आजपर्यंत हे सातत्याने वापरण्यापासून रोखणारे कोणीही नव्हते, असेही द्विवेदी म्हणाले.
 
या दरम्यान न्यायमूर्ती कांत यांनी विचारले की, जर देश त्या स्पायवेअरचा वापर दहशतवाद्यांविरोधात  करत असेल तर त्यात चूक काय आहे? तुमच्याकडे स्पायवेअर असणे गैर नाही. ते कोणाविरोधात वापरले जाते हा मुद्दा आहे. हे इतके सोपे नाही. तुम्ही देशाच्या सुरक्षेशी तडजोड किंवा सुरक्षा सोडून देऊ शकत नाही. इस्रायली बनावटीचे स्पायवेअर पाळत ठेवण्यासाठी वापरले जात असल्याच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी २०१२ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने माजी न्यायाधीश आर.व्ही. रवींद्रन यांच्या देखरेखीखाली तीन सदस्यांची तांत्रिक समिती स्थापन केली होती. या समितीने सादर केलेल्या अहवालात त्यांच्याकडून तपासण्यात आलेल्या फोन्समध्ये स्पायवेअर असल्याचा कुठलाही ठोस पुरावा आढळला नसल्याचे म्हटले होते. 
 

Related Articles