रायगडमध्ये महाराष्ट्र दिनी ध्वज वंदन करण्यावरुन महायुतीत नाराजी नाट्य   

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे जिल्हा मुख्यालयावर महाराष्ट्र दिनी  होणार्‍या मुख्य ध्वज वंदनाचा मान पुन्हा एकदा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना दिल्याने शिवसेना शिंदे गटात नाराजीचा सूर पसरला आहे. आदिती तटकरे यांना ध्वजारोहणाचा मान मिळाल्याने रायगडमधील मंत्री भरत गोगावले समर्थकांनी आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली आहे. 
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १८ जानेवारी रोजी पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली होती. या यादीनुसार, नाशिकसाठी भाजपचे गिरीश महाजन तर रायगडसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अदिती तटकरे यांची निवड करण्यात आली होती. या घोषणेनंतर शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले आणि त्यांचे समर्थक आक्रमक झाले. त्यांनी थेट मुंबई-गोवा महामार्गावर उतरून टायर जाळत रास्ता रोखा आंदोलन केले. त्याचप्रमाणे, नाशिकमध्येही मंत्री दादा भुसे यांच्या समर्थकांनी आपली तीव्र नाराजी व्यक्त केली. या वाढत्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर, अवघ्या २४ तासांत नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबत घेतलेल्या निर्णयाला तात्पुरती स्थगिती देण्यात आली होती. नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा अद्यापही कायम असल्याचे दिसत असून,  महाराष्ट्र दिनाच्या झेंडावंदन कार्यक्रमावरून महायुतीत पुन्हा नाराजी नाट्य सुरू झाले आहे.  
 

Related Articles