प्रकाश भेंडे यांचे निधन   

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते व निर्माते प्रकाश भेंडे यांचे मंगळवारी निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, सूना आणि नातवंडे, असा परिवार आहे. दिवगंत अभिनेत्री उमा भेंडे यांचे ते पती होते.
 
चित्रपट लेखक, दिग्दर्शक, निर्माते, चित्रकार, अशी त्यांची ओळख होती. गेले काही दिवस ते आजारी होते. त्यांचे पार्थिव शीव येथील त्यांच्या निवासस्थानी दर्शनासाठी ठेवले होते. दादर येथील शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले.
 
‘भालू’ हा त्यांचा चित्रपट गाजला होता. ‘चिमुकला पाहुणा’, ‘अनोळखी’, ‘नाते जडले जिवांचे’ अशा चित्रपटांमधून त्यांनी भूमिका केल्या. त्यानंतर ‘भालू’ या चित्रपटाची निर्मिती केली. राजदत्त यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘भालू’ या चित्रपटात प्रकाश भेंडे यांनी पत्नी अभिनेत्री उमा भेंडे यांच्याबरोबर एकत्र काम केले होते. उमा भेंडे यांच्याबरोबर ‘चटकचांदणी’, ‘आपण यांना पाहिलंत का?’, ‘प्रेमासाठी वाट्टेल ते’, ‘आई थोर तुझे उपकार’ असे अनेक चित्रपट त्यांनी केले. 
 
उमा भेंडे यांच्या निधनानंतर त्यांनी पत्नीबरोबरचा एकत्रित प्रवास ‘गंध फुलांचा गेला सांगून’ या आत्मचरित्राच्या रुपात शब्दबध्द केला.सदैव उत्साही आणि शेवटपर्यंत चित्रपटांबरोबरच मनापासून चित्रकलेत रमलेल्या या ज्येष्ठ कलाकाराच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीचे आणखी एक पर्व लयाला गेल्याची भावना चित्रपटसृष्टीत व्यक्त होते आहे.
 

Related Articles