अकरावी प्रवेशासाठी महाविद्यालयांची नोंदणी सुरु   

पुणे : राज्याच्या माध्यमिक शिक्षण विभागाने राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील कनिष्ठ महाविद्यालयांची नोंदणी प्रक्रिया करून घेतली जाणार आहे. त्यासाठी आज बुधवारी आणि २ मे या दिवशी संबंधितांनी नौरोसजी वाडिया महाविद्यालयामध्ये उपस्थित रहावे, अशा सूचना पुणे जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षण अधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर यांनी दिल्या आहेत.
 
पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयामधील अकरावी प्रवेशासाठी राबविली जाणारी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया आता ग्रामीण भागातील प्रत्येक तालुक्यातील कनिष्ठ महाविद्यालयासाठी राबविण्याचे निश्चित झाले आहे. त्या उद्देशाने पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेला उपस्थित राहणार्‍या माध्यमिक शाळांच्या प्रतिनिधींनी कोणती कागदपत्रे घेऊन,यावीत याबाबतची यादीच शिक्षण विभागाने दिली आहे. सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून सर्व कनिष्ठ महाविद्यालयांनी शिबिरास वेळेत उपस्थित रहावे. सकाळी साडेदहा नंतर आलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांची नोंदणी होणार नाही याची नोंद घ्यावी, असे कारेकर यांनी प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात नमूद केले आहे.
 
पुणे जिल्ह्यातील भोर, वेल्हा, पुरंदर, हवेली, मुळशी या तालुक्यामधील कनिष्ठ महाविद्यालयांनी २९ एप्रिल रोजी वाडिया महाविद्यालयात कार्यशाळेसाठी उपस्थित राहणे आवश्यक आहे. तर इंदापूर, बारामती, दौंड, शिरूर या तालुक्यातील महाविद्यालयांनी ३० एप्रिल रोजी तर जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ या तालुक्यातील कनिष्ठ महाविद्यालयाने २ मे रोजी वाडिया कॉलेजच्या कार्यशाळेला उपस्थित राहावे, असे सुचित करण्यात आले आहे.
 
कनिष्ठ महाविद्यालयांच्या नोंदणीसाठी कव्हरिंग पत्र, तपासणी सूची, शासन मान्यता, प्रथम मान्यता, अंतिम मान्यता, तुकडी मान्यता, एसएससी विषय मान्यता, आयटी विषय मान्यता, बायफोकल विषय मान्यता, त्याचबरोबर २०२३-२४ व २०२४-२५ संच मान्यता आदी कागदपत्र घेऊन यावेत, असे परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.
 

Related Articles