कोथरुडमधील कचरा संकलन केंद्र तातडीने बंद करण्याचा निर्णय   

मेट्रो वनाज डेपोसाठी पालिका देणार जागा

पुणे :  कोथरूड कचरा डेपो येथील कचरा संकलन रॅम्प आजपासून तातडीने बंद करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिल्याने घनकचरा विभागाची चांगलीच कोंडी झाली आहे. कचरा रॅम्पची सुमारे तीस गुंठ्यांहून अधिकची जागा यापुर्वीच महामेट्रोच्या वनाज डेपोसाठी हस्तांतरीत करण्यात आली असून तिच्या विकसनासाठी मेट्रो प्रशासनाने तगादा लावल्याने आयुक्तांनी आदेश दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
 
कोथरूड येथील कचरा डेपो काही वर्षांपुर्वी देवाची उरूळी, फुरसुंगी येथे हलविण्यात आला आहे. कचरा डेपोची ही जागा महामेट्रोला डेपोसाठी देण्यात आली आहे. मात्र, कचरा डेपो बंद झाल्यानंतर महापालिकेने येथील तीस गुंठे जागेवर वारजे कर्वेनगर क्षेत्रिय कार्यालयाच्या हद्दीत गोळा होणारा ओला व सुका कचरा गोळा करण्यासाठी रॅम्प तयार केला होता. येथे या परिसरातून छोट्या मोठया घंटागाड्यांच्या माध्यमातून सुमारे १८५ टन कचरा गोळा होतो. येथे त्याचे विलगीकरण करून तो प्रक्रियेसाठी पाठविण्यात येतो. दरम्यान, मेट्रोचा विकास आराखडा तयार करताना कचरा डेपोची सर्वच जागा महामेट्रोला हस्तांतरीत करण्यात आली आहे. डेपोचे काम झाल्यानंतरही एका बाजूला रस्त्याच्या लगत असलेला रॅम्प सुरू होता.
 
हा रॅम्प हटवून महामेट्रोला विकसनासाठी जागा हस्तांतरीत करण्याबाबत महामेट्रोकडून महापालिकेकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. रॅम्पची पर्यायी व्यवस्था म्हणून महापालिकेने बावधन येथील चाळीस गुंठे जागेत रॅम्प विकसनासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. ही जागा एनडीए विमानतळाच्या फनेल झोनमध्ये येत असल्याने रॅम्पचे शेड बांधण्यासाठी डिफेन्सची परवानगी बंधनकारक आहे. यासाठी महापालिकेने अर्जही केला आहे. परवानगी मिळाल्याशिवाय येथे बांधकाम करता येणार नाही. अशातच आज महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी घनकचरा विभागाला तातडीने कचरा रॅम्प बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
 
या आदेशामुळे घनकचरा विभागातील अधिकार्‍यांची चांगलीच अडचण झाली आहे. या रॅम्पवर गोळा होणारा कचरा घोले रोड क्षेत्रिय कार्यालय आणि औंध क्षेत्रिय कार्यालयाच्या रॅम्पवर हलविण्यासाठी चाचपणी सुरू करण्यात आली आहे. या दोन्ही रॅम्पवर अगोदरपासून ताण आहे. तसेच संपुर्ण कोथरूड, वारजेमधील कचरा या दोन्ही रॅम्पवर न्यायचा झाल्यास वाहतूक खर्चातही वाढ होणार आहे. अचानकच रॅम्प बंद करून या दोन्ही रॅम्पवर कचर्याचा ताण वाढणार असल्याने तेथील यंत्रणा कोलमडण्याची भिती अधिकार्‍यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
 
वारजे येथील पीपीपी तत्वावरील मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटलच्या बांधकामासाठी अगदी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, केंद्रीय राज्यमंत्री, उच्च व शिक्षण मंत्र्यांनी प्रयत्न करून डिफेन्सची परवानगी मिळविली. कचर्‍याचा प्रश्न गंभीर होत असताना ही नेते मंडळी बावधन कचरा रॅम्पसाठी तातडीने डिफेन्सची परवानगी मिळवून देणार? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

Related Articles