प्रेमविवाहाचा राग; पित्याने मुलीसह जावयावर झाडल्या गोळ्या   

जळगाव : मुलीने प्रेमविवाह केल्याच्या रागातून पित्याने पोटच्या मुलीसह जावयावर गोळ्या झाडल्या. यात मुलीचा जागीच मृत्यू झाला. तर जावई गंभीर जखमी आहे. जळगाव जिल्ह्यातील चोपडामध्ये ही घटना घडली. किरण अर्जुन मंगले असे गोळीबार करणार्‍या व्यक्तीचे नाव आहे. तोे सीआरपीएफचा सेवानिवृत्त अधिकारी आहे. तृप्ती अविनाश वाघ असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव असून, अविनाश ईश्वर वाघ हा गोळीबारात गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी घटनेतील पिस्तूल जप्त केले आहे.
 
दोन वर्षांपूर्वी आरोपी किरण मंगले यांची मुलगी तृप्ती हिने अविनाश याच्याशी प्रेमविवाह केला होता. हा प्रेमविवाह किरण मंगले यांनी कधीच मान्य केला नाही.  अविनाशच्या बहिणीच्या हळदीच्या कार्यक्रमानिमित्त हे दाम्पत्य चोपडा येथे आले होते. याची कुनकून किरण मंगले याला लागली. त्याने हळदीच्या ठिकाणी येऊन तृप्ती आणि अविनाशवर गोळीबार केला. यात तृप्ती जागीच ठार झाली. अविनाशच्या पाठीत आणि हाताला गोळ्या लागल्या असून, तो गंभीर जखमी आहे. त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या घटनेनंतर वर्‍हाडींनी किरण मंगले याला पकडून मारहाण केली. यात तोही जखमी झाला आहे.

Related Articles