बेकायदा पिस्तूल बाळगल्याप्रकरणी सराईतांवर कारवाई   

पुणे : बेकायदा देशी पिस्तूल बाळगणार्‍या सराईतांवर गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने कारवाई केली. सिंहगड रस्त्यावरील दांडेकर पूल परिसरातून दोन सराईतांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून पथकाने देशी बनावटीच्या पिस्तुलासह काही काडतूसे जप्त केली. 
  
गणेश गौतम वाघमारे (वय-२८) आणि तेजस काशीनाथ शेलार (वय-२५, दोघे रा. सर्व्हे क्रमांक १३०, दांडेकर पूल, सिंहगड रस्ता) अशी अटक करण्यात आलेल्या सराईतांची नावे आहेत. वाघमारे आणि शेलार हे सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्याविरुद्ध विविध पोलिस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. वाघमारे याच्याविरुद्ध पर्वती पोलिसांकडून महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई करण्यात आली होती. या कारवाईत तो जामीन मिळवून कारागृहातून बाहेर पडला होता. वाघमारे याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल असून तो दांडेकर पूल भागात दहशत माजवित असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकातील पोलिस हवालदार राजेंद्र लांडगे, पोलिस शिपाई अमर पवार आणि मयूर भोकरे यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून वाघमारे याला पकडले.
  
वाघमारे याच्याकडे पिस्तुलाबाबत अधिक चौकशी करण्यात आली. त्यावेळी माझ्याकडे पिस्तूल आहे. मात्र, ते शेलार याने विकत घेतल्याची माहिती त्याने दिली. प्रतिस्पर्धी टोळीकडून हल्ला होण्याची शक्यता असल्याने दोघेही पिस्तूल बाळगतात, अशी माहिती त्याने पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी शेलार याला देखील ताब्यात घेतले. शेलार याच्याकडून देशी बनावटीच्या पिस्तूलासह दोन काडतुसे जप्त करण्यात आली. दोघांविरुद्ध पर्वती पोलिस ठाण्यात बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त निखील पिंगळे, सहाय्यक आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शैलेश संखे, सहाय्यक निरीक्षक राजेश माळगावे, उपनिरीक्षक अस्मिता लाड यांनी ही कारवाई केली.

Related Articles