उधमपूरमध्ये चकमकीत लष्कराचा जवान हुतात्मा   

जम्मू : जम्मू-काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात सुरक्षादल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीत भारतीय लष्कराचा एक जवान शहीद झाला आहे, अशी माहिती अधिकार्‍यांनी दिली.
 
उधमपूर जिल्ह्यातील डुडू-बसंतगड परिसरात दहशतवादी असल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली होती. त्याआधारे, शोध मोहीम हाती घेतली होती. यादरम्यान, दहशतवाद्यांनी सुरक्षादलावर गोळीबार केला, ज्याला जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. यात एक जवान शहीद झाला. व्हाईट नाईट कॉर्प्सने ‘एक्स’ या समाज माध्यमावरील पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, गोपनीय माहितीच्या आधारे उधमपूरच्या बसंतगड परिसरात जम्मू आणि काश्मीर पोलिसांसोबत संयुक्त कारवाई हाती घेण्यात आली होती. त्यावेळी ही चकमक उडाली. अद्याप चकमक सुरू आहे. झंटू अली शेख असे शहीद जवानाचे नाव आहे. शेख यांचे धैर्य आणि शौर्य कधीही विसरले जाणार नाही, असे लष्कराने म्हटले आहे. तसेच, या दुःखाच्या क्षणी आम्ही शोकाकुल कुटुंबासोबत एकजुटीने उभे आहोत, असे लष्कराने म्हटले आहे. 
 
डुडू-बसंतगड परिसरातून चार संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. ते लष्कर-ए-तोयबाला मदत करत असल्याचा संशय आहे. मागील २४ तासांत जम्मूमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलामध्ये झालेली ही दुसरी चकमक आहे. 
 

Related Articles