कपाळावरील टिकली काढली तरी ‘कुंकू’ हरपले...!   

भावनांना वाट करुन देताना गनबोटे आणि जगदाळे कुटुंबीयांनी सांगितला हल्ल्याचा थरार... 

पुणे : आम्ही लपलेल्या ठिकाणी दहशतवादी आले. ‘अजान पढते हो क्या?’ असा सवाल त्यांनी केला. आम्ही महिलांनी क्षणात कपाळावरील टिकल्या काढून फेकल्या. आम्ही अल्लाचे नाव घेतले. तरी त्यांनी माझ्या पतीला गोळ्या घातल्या. मी कपाळावरची टिकली काढून फेकली; तरी, त्यांनी माझे ‘कुंकू’ कायमचे हिरावले. मन पिळवटून टाकणार्‍या शब्दांत कौस्तुभ गनबोटे यांच्या पत्नीने दहशतवादी हल्ल्याचे गुरूवारी कथन केले. 
 
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील कौस्तुभ गनबोटे व संतोष जगदाळे यांचा मृत्यू झाला. काल पहाटे त्यांचे पार्थिव पुण्यात आणण्यात आले. पार्थिव घरी येताच गनबोटे यांच्या पत्नीने अश्रूंना वाट मोकळी करून दिली.त्या म्हणाल्या, कौस्तुभ आणि त्यांचे मित्र संतोष जगदाळे यांना दहशतवाद्यांनी समोर बोलावून घेतले. दहशतवाद्यांनी आधी जगदाळे यांच्यावर गोळ्या झाडल्या. नंतर माझ्या पतीवर गोळी झाडली. गोळ्या घालत असताना आम्ही जोरजोरात अल्लाचे नाव घेतले; तेव्हा ते निघून गेले. आणखी एक पुरूष मागे बसला होता; त्यालाही त्यांनी मारले, असे कौस्तुभ गनबोटे यांच्या पत्नीने सांगितले. हा थरार सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले तर, ते ऐकून सारेच स्तब्ध झाले.
 
संतोष जगदाळे यांच्या पत्नी प्रगती म्हणाल्या, दहशतवादी मास्क घालून आले होते. त्यांनी लहान-लहान मुलांसमोर त्यांच्या वडिलांना गोळ्या घातल्या. ती मुले आमच्या समोर रडत होती. त्यांना काय सांगावे, हेच कळत नव्हते. आम्ही पळताना चिखलात पडलो. मला उभेही राहता येत नव्हते. मी माझ्या माणसाला आता बघू शकत नाही, अशा शब्दांत त्यांनी आपल्या दुःखाला वाट करून दिली.
 
संतोष यांचे पार्थिव घरी आणल्यानंतर जगदाळे कुटुंबीयांना अश्रु अनावर झाले. प्रगती यांनी त्यांचा अनुभव या वेळी कथन केला. ‘मी माझ्या माणसाला आता बघू शकत नाही. त्यांनी आमच्या माणसांना जशा गोळ्या घातल्या, तशा त्यांनाही घाला, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.मी आयुष्यभरासाठी पोरकी झाले आहे. माझा नवरा माझ्या बरोबर नाही. या मुलांनी काय करायचे, असा उपस्थितांना हताश करणारा प्रश्न त्यांनी विचारला. कालपासून मला त्यांचा चेहरा दिसला नाही, घटनेनंतर तिथेही आम्हाला दाखविण्यात आला नाही. त्या दहशतवाद्यांना मारा आणि आम्हाला दाखवा, असे म्हणत त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

डोळ्यादेखत वडिलांवर झाडल्या तीन गोळ्या   

मी माझे आई-वडील आणि वडिलांचे मित्र कौस्तुभ गनबोटे आणि त्यांची पत्नी मिनी स्वित्झर्लंड येथे फिरत होतो. छायाचित्र काढत असताना डोंगराच्या दिशेने गोळीबाराचा आवाज आला. आम्ही घाबरलो पळापळ सुरू झाली. काही जण लपले, तर काही जण पळाले. शेजारच्या टेंटमध्ये आम्ही लपण्याचा प्रयत्न केला. तेथे दहशतवादी आले, त्यांनी वडिलांना गुडघ्यावर बसविले आणि आमच्या डोळ्यादेखत तीन गोळ्या झाडल्या. त्यानंतर त्यांनी गनबोटे यांच्यावर गोळीबार केला. त्यांनी महिलांवर गोळ्या झाडल्या नाहीत. त्यानंतर आम्ही पळालो. नंतर जवान आल्यानंतर त्यांनी लपलेल्या सर्व पर्यटकांना बाहेर काढले. आम्हाला त्यांनी लष्करी शिबिरात नेले. रात्री उशिरा वडील गेल्याचे त्यांनी कळविले. काळीज पिळवटून टाकणारा प्रसंग संतोष जगदाळे यांच्या कन्या आसावरी यांनी सांगितला. 

उपचारात दिरंगाई झाली नसती तर...  

मिनी स्वित्झर्लंड येथे दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर अनेक जण जखमी अवस्थेत आरडा-ओरडा करत होते. पण, तिकडे कुणीच नव्हते. अधिकारी किंवा सुरक्षारक्षकही नव्हते. माझ्या पतीच्या उपचारांत दिरंगाई झाली. ‘जिवंत आहेत; जिवंत आहेत, असे रात्रीपर्यंत आम्हाला सांगत होते. पण, आम्हाला तपशिलात काहीच माहिती मिळत नव्हती. रात्री उशिरा संतोष जगदाळे यांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात आले. एका घोडेवाल्याने प्रतिकार केला, त्यालाही दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या, असे प्रगती यांनी सांगितले.
 

Related Articles