कर्नाटक हापूसचा हंगाम आणखी पंधरा दिवस   

१० हजार पेट्यांची रोज आवक
 
पुणे : कर्नाटक हापूसचा हंगाम शेवटच्या टप्यात आला आहे. येत्या पंधरा दिवसांत हा हंगाम संपणार आहे. पावसाने उघडीप दिल्यामुळे कर्नाटक हापूसला ग्राहकांकडून चांगली मागणी होत असल्याची माहिती व्यापारी रोहन उरसळ यांनी दिली. 
 
कोकणातील हापूस प्रमाणेच कर्नाटकांतील आंब्याच्या झाडांना यावेळी फळधारणा कमी होती. त्यामुळे यावेळी कर्नाटक हापूसचा हंगाम उशिराने सुरू झाला होता. एप्रिल महिन्यापर्यंत आवक मर्यादित होती. मात्र, मे महिन्यात मोठ्या प्रमाणात आवक वाढली. त्यानंतर पावसाला सुरूवात झाल्याने या आंब्याला पावसाचा मोठा फटका बसला. पावसामुळे मागणी कमी झाली, तसेच दरही कमी झाले. त्यामुळे त्याचा आर्थिक फटका शेतकर्‍यांसह व्यापार्‍यांनाही सहन करावा लागला. आता मागणी वाढल्याने दरही चांगले मिळत असल्याचे रोहन उरसळ यांनी नमूद केले. 
 
कर्नाटकातील टुकमुर या भागातून हापूसची आवक होत आहे. ३ ते ४ डझनाच्या पेटीला ८०० ते १२०० रूपये दर मिळत आहे. मार्केटयार्डातील फळविभागात रोज १० हजार लाकडी पेट्यांची, तर ३ ते ४ हजार बॉक्सची आवक होत आहे. मे महिन्यात कर्नाटक हापूसची आवक २५ हजार पेट्यापर्यंत गेली होती. कर्नाटकातील हापूस आंब्यासह अन्य आंब्यांची प्रामुख्याने आवक पुण्यात होत आहे. मुंबईतील बाजारातही काही प्रमाणात आवक होत आहे. ही आवक येत्या १५ ते २० जूनपर्यंत राहू शकेल. त्यानंतर मात्र यंदाचा कर्नाटक हापूसचा हंगाम संपणार असल्याचेही रोहन उरसळ यांनी स्पष्ट केले. 
 
मागील हंगामात झालेला अधिकचा पाऊस. त्यानंतर लांबलेला परतीचा पाऊस आणि नंतर कमी प्रमाणात थंडी पडल्याने त्याचा आंब्याच्या झाडांवर परिणाम झाला होता. त्यानंतर आलेल्या वादळात झाडांचा मोहोर गळून पडला होता. या सर्व कारणामुळे यंदा कर्नाटकातील झाडांना फळधारणा कमी होती. मात्र, विक्रीसाठी बाजारात दाखल झालेल्या फळांचा दर्जा चांगला आहे. त्यामुळे पाऊस उघडल्यानंतर ग्राहक कर्नाटक हापूसला प्राधान्य देत असल्याचेही रोहन उरसळ यांनी सांगितले.  
 
घाऊक बाजारातील आंब्याचे दर
 
आंबा डझन/किलो               दर 
हापूस ३ ते ४ डझन       ८०० ते १२००
हापूस २ डझन ३०० ते ५००
पायरी ४ डझन ६०० ते ८००
लालबाग १ किलो २५ ते ३५
बदाम १ किलो २५ ते ३५

Related Articles