महावितरणचे खांब वाकले, ताराही तुटल्या   

मंचर, (प्रतिनिधी) : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील अवसरी परिसरात दोन दिवस पडलेल्या मुसळधार पावसाने सिमेंटचे खांब वाकले, तर काही ठिकाणी वीज वाहक तारा तुटल्याने वीज ग्राहकांना रात्र जागून काढावी लागल्याने ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली.
 
अवसरी खुर्द गावात महावितरण कंपनीचे उपकेंद्र आहे. या उपकेंद्रांतर्गत अवसरी खुर्द, गावडेवाडी, अवसरी बुद्रुक, टाव्हरेवाडी ही चार गावे आहेत. यासाठी टाव्हरेवाडी गावठाण फिटर योजनेअंतर्गत घरगुती ग्राहकांना २४ तास वीजपुरवठा केला जात आहे. परंतु गेली पाच दिवसापासून वरील गावामध्ये दोन वेळा मुसळधार पाऊस पडल्याने महावितरण कंपनीचे अनेक ठिकाणी सिमेंट खांब वाकले आहेत. तर काही ठिकाणी विद्युत तारा तुटल्या आहेत. अपुर्‍या कर्मचार्‍यांमुळे वीजपुरवठा सुरळीत करता येत नाही. त्यातच मुसळधार पावसामुळे चिखल तुडवत वायरमन यांना काम करावे लागत आहे. त्यामुळे काम वेळेत होत नाही. 
 
महावितरण कंपनीकडून घराचा वीजपुरवठा बंद करून विद्युत खांबांना अडसर ठरत असलेली झाडे व फांद्या तोडण्याची मोहीम हाती घेतली होती. मंगळवारी सायंकाळी चार नंतर झालेल्या वादळी वार्‍यासह पडलेल्या मुसळधार पावसामुळे अवसरी खुर्द जुना बैलगाडा घाटाचे एचपी पेट्रोल पंप जवळील रस्त्यालगत असलेल्या मुख्य विद्युत वाहिनीचे तार पडल्याने अवसरी गावचा विद्युत पुरवठा बंद होता. त्यानंतर रात्री उशिरा अवसरी बुद्रुक पावर हाऊस वरून तात्पुरता विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. पावसाळा चालू होण्याअगोदर महावितरण कंपनीचा बोजवारा उडाल्याने ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली.
 

Related Articles