हमासच्या समर्थनार्थ पत्रके वाटणारे पोलिसांच्या ताब्यात   

कर्वेनगर परिसरातील घटना

पुणे : हमास या वादग्रस्त संघटनेच्या समर्थनार्थ पत्रके वाटणार्‍या तरूणांना नागरिकांनी मारहाण केल्याची घटना रविवारी सायंकाळी कर्वेनगर परिसरात घडली. या प्रकारामुळे कर्वेनगर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी तत्काळ कारवाई करण्यास सुरूवात केली असून, पत्रके वाटणार्‍या तरूणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
 
कर्वेनगर परिसरात काही तरूण रविवारी सायंकाळी हमासच्या समर्थनार्थ पत्रके वाटत होती. हा प्रकार लक्षात येताच, स्थानिकांनी तत्काळ त्यांना विरोध केला. त्यानंतर, काही राजकीय कार्यकर्तेदेखील घटनास्थळी पोहोचले आणि संबंधित तरुणांना चोप दिला. यावेळी, काहींनी या घटनेचे चित्रीकरण करून ते समाजमाध्यमावर टाकले. समाजमाध्यमावर हा प्रकार पसरल्यानंतर सर्व स्तरातून संताप व्यक्त करण्यात आला.
 
घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. तसेच, संबंधित तरुणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी सुरू केली. स्थानिक नागरिकांनी या तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतला असून, पत्रके वाटण्यामागे असणारा त्यांचा हेतू आणि त्यामागील कोणाचा हात आहे का?, याचा तपास सुरू केला आहे. 
 
समाजमात कोणत्याही प्रकारच्या सामाजिक तेढ निर्माण करणार्‍या कृतींना मुभा दिली जाणार नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केल आहे. मात्र, या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून, यापुढे अशा घटना घडू नयेत यासाठी पोलिस प्रशासन अधिक सतर्क झाले आहे.
 

Related Articles