जानवे काढण्यास नकार; विद्यार्थ्याला परीक्षेपासून रोखले   

कर्नाटकातील प्रकार; प्राचार्य निलंबित 

बेंगळुरू : जानवे काढण्यास नकार दिल्यामुळे विद्यार्थ्याला सीईटी परीक्षेपासून रोखल्याचा प्रकार कर्नाटकच्या बिदर जिल्ह्यातील साई स्फुर्ती पीयू महाविद्यालयात घडला. या प्रकरणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रशेखर बिरादार आणि कर्मचारी सतीश पवार यांना निलंबित करण्यात आले आहे.
 
१७ एप्रिल रोजी गणिताची सीईटी परीक्षा होती. सुचिव्रत कुलकर्णी हा विद्यार्थी कर्नाटकातील बिदर येथे परीक्षा देण्यासाठी गेला होता. त्यावेळी महाविद्यालयात त्याची तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्याला जानवे काढ अन्यथा परिक्षेला बसू देणार नाही, असे सांगितले. तो ४५ मिनिटे महाविद्यालय प्रशासनाला विनंती करत राहिला; पण शेवटी त्याला घरी परत यावे लागले. शनिवारी हे प्रकरण चर्चेत आले आणि त्यावरून वादंग निर्माण झाले आहे.  
 
शिवमोगा जिल्ह्यातील आदिचुंचनागिरी शाळेतही असाच प्रकार घडला. तिथेही सीईटी देण्यासाठी आलेल्या तीन विद्यार्थ्यांना त्यांचे जानवे काढण्यास सांगण्यात आले. एका विद्यार्थ्याने नकार दिला तेव्हा त्याला थांबवण्यात आले. तर इतर दोन विद्यार्थ्यांनी परीक्षा हॉलमध्ये प्रवेश करण्यापूर्वी जानवे काढले. कर्नाटक ब्राह्मण महासभेच्या वतीने पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली.

Related Articles