सिंहगड पुलाचे नियोजन फिस्कटले   

दुसरी बाजू सुरू होण्यास आणखी कालावधी लागणार

पुणे : पुण्यातील बहुप्रतीक्षित आणि सर्वात लांब अशी ओळख असणार्‍या सिंहगड पूलाची एक बाजू ही १ मे रोजी खुली करण्यात आली. पुलाचे उद्घाटन झाल्यावर दुसरी बाजू दोन महिन्यात सुरू करण्याचे महानगर पालिकेचे नियोजन होते.मात्र, पावसामुळे महानगर पालिकेचे दुसरी बाजू पूर्ण करण्याचे नियोजन फिस्कटले असून आता दुसरी बाजू सुरू व्हायला आणखी कालावधी लागणार आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणार्‍या नागरिकांची सध्या तरी वाहतूक कोंडीतून सुटका होण्याचे चिन्ह नाही. 
 
पुण्यातील सिंहगड रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. या मार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी या मार्गावर पूल तयार करण्यास मंजूरी देण्यात आली होती. महानगर पालिकेच्या भवन विभागाने  २१ सप्टेंबर २०२१ मध्ये या पुलाच्या कामाला सुरुवात केली.  अडीच किलोमीटर लांबीचा हा पूल असून  हा उड्डाणपूल मार्चअखेर तर माणिकबाग ते विठ्ठलवाडीदरम्यान उड्डाणपूल डिसेंबरअखेर वाहतुकीसाठी खुला करण्याचे प्रशासनाने जाहीर किले होते. विठ्ठलवाडी ते फन टाइम चित्रपटगृहादरम्यानचा उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले होते. त्यामुळे हा पूल कधी सुरू होणार? सवाल पुणेकरांनी उपस्थित केला होता.  या पुलाचे काम नियोजित वेळेच्या सहा महिन्या आधी पूर्ण झाल्याने  १ मे रोजी पूलाची एक बाजू  वाहतुकीसाठी खुली करण्यात आली.  
 
पूलाची दुसरी बाजू जुलै महिन्यात सुरू करण्याचे पालिकेचे नियोजन होते. त्या दृष्टीने तयारी देखील सुरू करण्यात आली होती. एक बाजू पूर्ण झाल्याने तेथील कामगार व अभियंत्रे पूलाची दुसरी बाजू पूर्ण करण्याच्या कामी लागले. हा पूल जवळपास पूर्ण झाला आहे. दुसर्‍या बाजूच्या पुलावर काही ठिकाणी डांबरीकरन पूर्ण करण्यात आले आहे. तर काही ठिकाणी रस्ता तयार करण्याचे काम सुरू आहे. या पुलावर मुरूम टाकून रस्ता तयार केला जात होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे या कामात अडथळे येत आहेत. 
 
मुरूमामुळे चिखल 
 
सिंहगड पुलाच्या दुसर्‍या बाजूचे काम वेगाने सुरू आहे. पूलावरील रस्ता तयार करण्यासाठी मुरूम टाकण्यात आला आहे. यामुळे चिखल झाला असून पुढील कामे करण्यास अडचणी येत आहे. पावसाचा जोर कमी झाल्यावर पुन्हा काम वेगाने सुरू करण्यात येणार असल्याची माहिती भवन विभागाचे उपायुक्त युवराज देशमुख यांनी दिली. 

Related Articles