ब्रिटन युक्रेनला देणार एक लाख ड्रोन   

कीव : रशिया-युक्रेनमध्ये युद्ध पेटले असतानाच ब्रिटनने युक्रेनला एप्रिल २०२६ पर्यंत एक लाख ड्रोन देण्याची घोषणा केली आहे. ब्रिटन युक्रेनला उघडपणे मदत करणार्‍या पाश्चात्य देशांत सामील झाला असून, ब्रिटनची भूमिका नेहमीच रशियाच्या विरुद्ध राहिली आहे. 
 
मागील अडीच वर्षांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू आहे. दोन्ही देशांकडून एकमेकांवर हल्ले सुरू आहेत. तीन दिवसांपूर्वीच युक्रेनियन ड्रोनने रशियात घुसखोरी करत विमानतळांवर हल्ले केले होते. यात रशियाची जवळपास ४१ लढाऊ विमाने नष्ट झाली होती. रशियासोबत युद्ध चालू असताना युक्रेनला आता एक लाख ड्रोन मिळणार असल्याने युक्रेनचे बळ चांगलेच वाढणार आहे. ब्रिटनने युक्रेनला पुरवण्यात येत असलेल्या ड्रोन्समध्ये तब्बल १० पटीने वाढ केली आहे.
 
ब्रिटन सरकारने यासंदर्भातील निवेदनात म्हटले आहे की, आम्ही युक्रेनला ४.५ अब्ज पाउंडची लष्करी मदत करणार आहोत. याचाच एक भाग म्हणून आम्ही एप्रिल २०२६ पर्यंत त्यांना एक लाख ड्रोन देणार आहोत. ब्रिटिश संरक्षणमंत्री जॉन हेली यासंदर्भात घोषण करतील. या वर्षाच्या अखेरपर्यंत युक्रेनला हजारो ड्रोनचा पुरवठा केला जाईल. त्याव्यतिरिक्त एप्रिल महिन्यापर्यंत एक लाख ड्रोनचे लक्ष ठेवण्यात आले आहे. ड्रोन्स शिवाय मोठ्या प्रमाणावर दारूगोळा देण्याचीही तयारी आहे.
 
तत्पूर्वी, आपण युक्रेनला ५ अब्ज पाउंडची मदत करणार आहोत, जेणेकरून ते लॉन्ग रेंजचे मिसाइल बनवू शकतील. तसेच, रशियासोबत लढताना युक्रेनला लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांची अत्यंत आवश्यकता आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, जर्मनी देखील युक्रेनला लाबं पल्ल्यांचे क्षेपणास्त्र देणार आहे. 

ड्रोन हल्ल्यांत युक्रेन सरस

युक्रेनला युद्धकाळात अनेक देशांकडून मदत मिळत आहे. तोफा, बंदूका तसेच गोळीबार यांच्या माध्यमातून केल्या जाणार्‍या हल्ल्यांत रशिया युक्रेनपेक्षा वरचढ ठरत आहे. मात्र, ड्रोन हल्ल्यांमध्ये युक्रेनने सरशी केली आहे.
 

Related Articles